मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : आपल्याला कोणाला दुखवायचे नाही, टीकाटिपणीही करायची नाही. ज्यांचे त्यांना लखलाभ, आपल्याला काही घेणेदेणे नाही. जिद्दीने, नव्या विचाराने पक्ष वाढवायचा आहे… तुम्ही परिस्थिती निर्माण केली आणि आम्हाला इकडे यावे लागले. कशाला अजुन दुगाण्या झाडत बसला आहात? आम्ही आमचे बघतो, तुम्ही तुमचे बघा… विसरा आता आम्हाला, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने रविवारी शरद पवार गटाच्या नेत्यांना कवून टाकले.
मुंबई विभागीय राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा रविवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडला. उपमुख्यमंत्री, अजित पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांच्यासह पक्षाचे मुंबईतील नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबईतील पक्षवाढीकडे मागच्या काळात दुर्लक्ष झाल्याची कबुली देतानाच नव्या दम्याने येत्या काळात पक्षवाढीसाठी काम करण्याचा निर्धार सर्वच नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.
महायुतीत असलो तरी धर्मनिरपेक्षतेची भूमिका सोडलेली नाही, यशवंतराव चव्हाणांच्या विचारांने लोकांची कामे करण्याचे धोरण आहे असे सांगत सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न असल्याची भूमिका नेत्यांनी मांडली. तर, शरद पवार गटासोबत वादावादीत न पडता आता आपल्या मागनि जाण्याची भाषाही या नेत्यांनी या मेळाव्यात केली.
अजित पवार यांनी आपल्या भाषणात मुंबईतील प्रश्नांवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे. प्रश्न सोडविण्याची ताकद आणि धमक आपल्यात आहे. धारावीतील टेंडरमुळे एका उद्योगपतीला फायदा होणार आहे अशी बोंब मारली जात आहे. त्याच्या खोलात जाऊन माहिती घेऊ, असे सांगत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तर, सर्वसामान्य लोकांची कामे व्हायला हवी त्याकरता सत्तेत येण्याचा निर्णय घेतला. विरोधाला विरोध करायचा, मोर्चे काढायचे, यातून प्रश्न सुटणार आहे का? स्वतः ची प्रसिद्धी करण्यासाठी मी काम करत नाही किंवा सोशल मिडियावर पोस्ट करत नाही. काहीजण खड्ड्याजवळ जातात आणि सेल्फी काढतात, पण मला असली नौटंकी आवडत नाही. पहाटे उठून लोकांची कामे कशी होतील असा माझा प्रयत्न असतो असा टोलाही अजित पवार नाव न घेता लगावला. तर, एका विशिष्ट परिस्थितीमुळे आम्ही इथे आलो. तुम्ही ती परिस्थित उभी केली. प्रत्येक वेळा तुम्ही तळ्यात मळ्यात राहिला. आम्ही ठरवले आणि एकदाचा निर्णय घेतल्याचे छगन भुजबळ म्हणाले. शरद पवार गटातील नेते, विशेषतः जितेंद्र आव्हाड आमच्या जितकी टीका करतील तेवढी अपली शक्ती वाढणार आहे. उरले सुरले देखील आता आमच्याकडे येतील. उरला सुरला पक्ष संपवायला बाकी लोकांची गरज नाही, हेच लोक पक्ष संपवून टाकतील, असा टोलाही भुजबळांनी लगावला.
मुंबई शहरावर लक्ष केंद्रित केले तर परिस्थिती आपल्या बाजूने येऊ शकते, असे प्रफुल पटेल म्हणाले. तर, येत्या निवडणुकीत मुंबईत तिप्पट नगरसेवक असतील अशी ताकद उभी राहिल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणावर सर्वांची जी भूमिका तीच आपली भूमिका – भुजबळ
ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या हे मी बोललो आणि सगळे नेते तेच बोलत आहेत. फक्त मी जास्तीचे आणि समाजाला समजेल असे बोलत आहे. तुम्ही ओबीसींमधील आरक्षण कशाला मागताय.
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आरक्षण दिले होते, आता कोर्टात याबाबत चर्चा सुरु आहे. त्यावेळी राहिलेल्या त्रुटी दूर केल्या जात आहेत. राजकारण कोण करत असेल तर पंचायत होईल. गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसीच्या मुद्यावर तर मी शिवसेनेतून काँगेसमध्ये शरद पवार यांच्यासोबत आलो. कुणाच्या हक्कावर गदा येणार नाही असे काम आपल्याला करायचे आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.
Latest Marathi News ‘तुमचे तुम्हाला लखलाभ, विसरा आता आम्हाला’; अजित पवार गटाचा सल्ला Brought to You By : Bharat Live News Media.
‘तुमचे तुम्हाला लखलाभ, विसरा आता आम्हाला’; अजित पवार गटाचा सल्ला