फुकटची बिर्याणी खाणार्या गुंडाला ठोकल्या बेड्या

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मध्यवर्ती बसस्थानकासह परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यासह फेरीवाल्यांना दमदाटी करून चार वर्षे फुकटची बिर्याणी खाणार्या फाळकूट गुंडाला शाहूपुरी पोलिसांनी रविवारी सकाळी बेड्या ठोकल्या. आकाश आनंद भोसले (वय 30, रा. ताराराणी चौक, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्यास 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आकाश भोसलेसह त्याच्या आणखी एका साथीदाराची मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दहशत आहे. खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह फेरीवाल्यांना गाठून त्यांच्याकडून पैसे तसेच फुकटचे खाद्यपदार्थ उकळत असे. पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास परिसरात व्यवसाय करू देणार नाही, अशी तो धमकी देत होता. चार वर्षांपासून रोज रात्री खाद्यपदार्थ विक्री करणार्या स्टॉलवर येऊन बिर्याणी आणि मासे फुकट खात होता.
व्यावसायिकांच्या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. रविवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यास पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सहायक निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, संदीप जाधव, मिलिंद बांगर, बाबा ढाकणे, लखन पाटील, महेश पाटील आदींनी ही कारवाई केली.
फाळकूट गुंडाला होऊ शकते 10 वर्षांपर्यंत शिक्षा!
भारतीय दंडविधान संहिता कायदा कलम 384, 386, 504 आणि 506 अन्वये गुंड आकाश भोसलेविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात आरोप सिद्ध झाल्यास त्याला दहा वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो, अशी कायद्यात तरतूद असल्याचेही पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी सांगितले.
Latest Marathi News फुकटची बिर्याणी खाणार्या गुंडाला ठोकल्या बेड्या Brought to You By : Bharat Live News Media.
