नगर : पत्नी, मुलाची हत्या करत पतीने उचललं हे टोकाच पाऊल..

पारनेर/टाकळी ढोकेश्वर : Bharat Live News Media वृत्तसेवा : पत्नीशी झालेल्या किरकोळ भांडणातून पतीने, तिच्यासह पोटच्या सहावर्षीय मुलाला विषारी औषध पाजून, त्यांचा खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. पारनेर तालुक्यातील वारणवाडी येथील देवमळा येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. गजानन भाऊ रोकडे (वय 35), पौर्णिमा गजानन रोकडे (वय 34) व दुर्वेश गजानन रोकडे (वय 6, सर्व रा. उदापूर, ता.जुन्नर, जि.पुणे) अशी मयत झालेल्या तिघांची नावे आहेत. यातील मुलाचा मृतदेह एका पाण्याच्या डबक्यात आढळून आला आहे. या घटनेतून विषारी औषध पाजलेली मुलगी चैत्राली गजानन रोकडे (वय 9) ही बचावली असून, तिच्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी विजय भगवान रोकडे (वय 43, रा.उदापूर, ता.जुन्नर, जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, गजानन हा पत्नी पौर्णिमासह रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथे राहत होता. दोघेही गोरेश्वर पतसंस्थेच्या रांजणगाव शाखेत नोकरी करीत होते. पुतणी चैत्राली व पुतण्या दुर्वेश हे दोघेही लहानपणापासून आमच्याकडे राहत असल्याने, हे दोघे दर आठवड्याला आम्हाला भेटण्यासाठी गावी येत असत. गुरूवारी (दि.4) रात्री 11.30 च्या सुमारास गजानन व पौर्णिमा रांजणगाव गणपती येथून घरी आले होते. त्यावेळी रात्रीच्या वेळी येण्याचे कारण विचारले असता गजानन याने दोन दिवस सुट्टी घेतली असून, त्यांना उद्या पौर्णिमा हिच्या माहेरी श्रीरामपूर येथे मुलांसह जायचे असल्याचे सांगितले.
शुक्रवारी (दि.5) सकाळी 6 च्या सुमारास भाऊ गजानन हा भावजय पौर्णिमा, मुलगी चैत्राली व मुलगा दुर्वेश यांच्यासह मोटारसायकलवरून श्रीरामपूर येथे जाण्यासाठी निघाले होते. दुपारी 1 च्या दरम्यान पारनेर तालुक्यातील वारणवाडी येथील रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ पती-पत्नीचे अज्ञात कारणावरून भांडण झाले. त्यानंतर गजानन याने पत्नीसह दोन्ही मुलांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे असलेल्या ड्रममधील विषारी औषध बळजबरीने पाजले. त्यानंतर मुलगा दुर्वेश यास पाण्याच्या डबक्यात फेकून दिले. त्यानंतर पत्नी पौर्णिमा हिस साडीने गळफास देवून ठार मारले.
नंतर स्वतः साडीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव उगले यांच्यासह पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात भेट देत तपासाची चक्रे फिरवित नातेवाईकांशी संपर्क साधला. पोलिसांनी मयत गजानन भगवान रोकडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय ठाकूर, सहाय्यक फौजदार संदीप गायकवाड करत आहेत.
मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार
वारणवाडीतील ग्रामस्थ मुलगी चैत्राली रोकडे हिला घेऊन टाकळी पोलिस ठाण्यात आले. या मुलीने तिला वडिलांनी विषारी औषध पाजल्याचे सांगितल्यानंतर सर्व प्रकार उघड झाला. त्यामुळे तिला तातडीने नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हेही वाचा
भाजपचा खासदार झाल्यास शिरूरचे प्रश्न सुटतील : आ. महेश लांडगे
‘भीमाशंकर’ला उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार; कारखाना अध्यक्षांची माहिती
जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला मराठा कुटुंबाशी संवाद
Latest Marathi News नगर : पत्नी, मुलाची हत्या करत पतीने उचललं हे टोकाच पाऊल.. Brought to You By : Bharat Live News Media.
