तब्बल 125 वर्षांपासून कैदेत आहे ‘हे’ झाड!

इस्लामाबाद : झाडा-झुडपांना भटक्या जनावरांचा उपद्रव होऊ नये म्हणून अनेक वेळा त्याभोवती कुंपण घातले जात असते. मात्र एखाद्या झाडाला चक्क ‘कैदे’तही ठेवले गेले असेल याची आपण कल्पना करणार नाही. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एक वडाचे झाड गेल्या 125 वर्षांपासून असे कैदेत आहे!
तेथील हे झाड आजही लोखंडी साखळ्यांमध्ये बांधलेले आहे. त्यावर एक बोर्ड असून त्यावर लिहिले आहे ‘आय एम अंडर अरेस्ट!’ एका इंग्रज अधिकार्यामुळे हे झाड असे कैदेत असल्याचे सांगितले जाते. जेम्स स्क्विड नावाचा हा इंग्रज अधिकारी एका रात्रीत बराच नशेत होता. त्याला असा भास झाला की एक झाड त्याच्या दिशेने चालत येत आहे. हा भास झाल्यामुळे तो चांगलाच घाबरला आणि त्याने सोबत असलेल्या जवानांना आदेश दिला की या झाडाला ताबडतोब अटक करा! मग काय त्यावेळी जे या झाडाला अटक झाली ती अद्यापही सुरूच आहे!
काही तज्ज्ञांच्या मते हे झाड ड्रेकोनियन फ्रंटियर क्राईम रेग्युलेशन कायद्याचे प्रतीक आहे. हा कायदा ब्रिटीश शासनावेळी करण्यात आला होता. त्यानुसार ब्रिटीश सरकारला हा अधिकार होता की ते पश्तुन समुदायाच्या कोणत्याही व्यक्ती किंवा परिवाराला एखाद्या गुन्ह्यासाठी शिक्षा करू शकतात. आश्चर्याची बाब म्हणजे हा कायदा अजूनही वायव्य पाकिस्तानच्या काही भागात लागू आहे. या कायद्यामुळे अनेक लोक अनेक अधिकारांपासून वंचित राहतात. या कायद्यानुसार गुन्ह्याचा कोणताही पुरावा नसला तरी परिसरातील लोकांना अटक केली जाऊ शकते.
Latest Marathi News तब्बल 125 वर्षांपासून कैदेत आहे ‘हे’ झाड! Brought to You By : Bharat Live News Media.
