राजकारण : काँग्रेस ‘हात’ का पसरतेय?

विश्वास सरदेशमुख
देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकांसाठीच्या मोर्चेबांधणीमध्ये व्यस्त आहेत. गेल्या काही वर्षांत लोकशाही पद्धतीचा कणा असणार्या निवडणुकांचे अर्थकारण पुरते पालटून गेले आहे. त्या अत्यंत महागड्या झाल्या आहेत. यासाठीचा पैसा राजकीय पक्ष विविध रूपाने देणग्या मिळवून करत असतात. काँग्रेस पक्षाने सध्या निवडणुकांपूर्वी ‘डोनेट फॉर देश’ नावाने एक अभियान सुरू केले असून, या माध्यमातून देशातील नागरिकांकडून देणग्या मागितल्या जात आहेत.
काँग्रेस पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर जनतेकडून देणगी गोळा करण्यासाठी ‘डोनेट फॉर देश’ नावाने अभियान सुरू केले आहे. हे अभियान पक्षाच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकणारे आहे आणि यानिमित्ताने अनेक प्रश्न निर्माण होतात. वास्तविक काँग्रेस पक्ष हा ‘क्राऊड फंडिंग’च्या माध्यमातून जनतेकडून देणगी गोळा करणार आहे. पक्षाने ऑनलाईन देणगी गोळा करण्यासाठी एक पोर्टलदेखील लाँच केले. या पोर्टलच्या माध्यमातून पक्षाला 138, 1380, 13,800 रुपये किंवा त्यापेक्षा दहा पट अधिक रक्कम देण्याचे आवाहन केले जात आहे. देणगीसाठी अशा रकमेचा आकडा ठेवण्यामागचे कारण म्हणजे काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 138 वर्षे पूर्ण झाली आहेत. यादरम्यान जनतेपर्यंत पोचण्यासाठी आणि लोकांना पक्षाशी जोडण्यासाठी अभियान सुरू केले आहे. 28 डिसेंबरला पक्षाने 138 वा स्थापना दिवस साजरा केला.
ऑनलाईन देणगी अभियान
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या मोहिमेची सुरुवात केल्यानंतर ‘डोनेट फॉर देश’ अभियानामागची भूमिका सांगितली. या माध्यमातून काँग्रेस सामान्य जनतेकडून मदत घेऊन देशाला पुढे नेण्यासाठी काम करेल. काँग्रेसला नेहमीच सर्वसामान्य जनतेची साथ मिळाली आहे.
महात्मा गांधी यांनी देशवासीयांच्या पाठिंब्यावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ‘डोनेट फॉर देश’ अभियान आता देशात एक चळवळ म्हणून समोर येत असून, त्यात नागरिक पुढे येऊन देणगी देत आहेत, असे खर्गे म्हणाले. केवळ श्रीमंतांकडून मिळणार्या निधीवर अवलंबून राहिल्यास त्यांच्याच धोरणांनुसार आणि सूचनेनुसार काम करावे लागेल. त्याऐवजी लहानसहान देणगीतून देश उभारला जावू शकतो आणि सर्व स्तरातील लोक या कार्यक्रमात सहभागी होतील, तेव्हा सर्वसमावेशक धोरण आखले जाईल. ओबीसी, एससी, एसटी आणि मागास घटकांसाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक देणगी देतील आणि आपल्यासमवेत काँग्रेस पक्ष आहे, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले.
काँग्रेसने ‘एक्स’ या सोशल मीडिया संकेतस्थळावर या देणगीसंदर्भात एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे, की आम्ही राज्य पातळीवरील पदाधिकारी, निवडणूक प्रतिनिधी, प्रभारी, जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि एआयसीसी पदाधिकार्यांना किमान 1380 रुपये योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. काँग्रेसने ऑनलाईन देणगी देण्यासाठी पोर्टलबरोबरच अॅपदेखील लाँच केले आहे. पक्षाला देणगी देणार्यांना एक प्रमाणपत्रदेखील दिले जाईल.
यापूर्वी देखील देणगी अभियान
एखाद्या राजकीय पक्षाने जनतेकडून देणगी गोळा करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील 2021 मध्ये भाजपने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देणगीची मोहीम राबविली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार रुपयांची देणगी दिली होती. तसेच जनतेला देणगीसाठी आवाहन करण्यात आले होते. पक्षातील अनेक नेत्यांनी आणि केंद्रीय मंत्र्यांनी देणगीची पावतीदेखील सोशल मीडियावर पोस्ट केली होती. आम आदमी पक्षानेदेखील 2014 मध्ये देश-विदेशातून देणगी मिळवण्यासाठी अभियान राबविले होते.
पक्षाचा विस्तार आणि निवडणूक प्रचार मोहिमांसाठी देणगी गोळा करत असल्याचे ‘आप’ पक्षाने सांगितले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे लोकवर्गणी जमा करून आपल्या प्रचार खर्चाची तजवीज केली होती. त्यावेळी राजू शेट्टी यांच्या सभांदरम्यान त्यांचे कार्यकर्ते प्रचारासाठीच्या निधीसाठी उपस्थितांना आवाहन करत असत.
भरलेली तिजोरी
भारतीय राजकीय पक्षांवर लक्ष ठेवणार्या ‘द असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) च्या अहवालानुसार देशातील आठ राष्ट्रीय पक्षांनी घोषित केलेल्या संपत्तीत एका वर्षात 1531 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ‘एडीआर’च्या रिपोर्टनुसार 2020-21 मध्ये भाजपची एकूण संपत्ती 4990 कोटी होती आणि ती 2021-22 मध्ये 1056 कोटी रुपयांनी वाढत 6046 कोटी रुपये झाली. त्यातुलनेत काँग्रेसची मालमत्ता वाढलेली नसली, तरी 2020-21 मध्ये काँग्रेसची एकूण संपत्ती 691 कोटी रुपये होती आणि ती 2021-22 मध्ये 114 कोटींनी वाढत 805 कोटींवर पोचली.
लोकसभा निवडणुकीवर लक्ष
या अभियानाच्या माध्यमातून चांगला निधी उभा करण्यात यशस्वी होऊ, अशी काँग्रेसला आशा आहे. या आधारे लोकसभा निवडणुकीत मदत मिळू शकते, असे काँग्रेस नेत्यांना वाटते. सध्याच्या काळात आर्थिक आघाडीवर भाजप काँग्रेसपेक्षा कितीतरी पटीने पुढे आहे. या कारणांमुळेच काँग्रेस पक्षाला आर्थिक रूपाने बळकटी देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
जनतेशी जोडण्याचा प्रयत्न
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी देणगी अभियान स्थापनेच्या काळात सुरू राहील, असे सांगितले. त्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जावून आणि प्रत्येक बूथमधील किमान दहा जणांच्या भेटीगाठी घेत किमान 138 रुपयांची देणगी घेण्याचा प्रयत्न असेल. या अभियानाच्या माध्यमातून पक्ष जनतेपर्यंत पोेहोचेल आणि त्यांना पक्षाशी जोडून घेण्याचे काम सुरू होईल. 1920-21 मध्ये महात्मा गाधी यांंनी राबविलेल्या टिळक स्वराज निधी अभियानाची प्रेरणा घेत ही ‘डोनेट फॉर देश’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. उपलब्ध स्रोतांचे समान वितरण आणि उपलब्ध संधीच्या माध्यमातून समृद्ध भारताची उभारणी करण्यासाठी पक्षाला सशक्त करणे, हा यामागचा हेतू आहे.
निधीची कमतरता
प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष सध्या आर्थिक चणचणीचा सामना करत आहे आणि भाजपच्या रणनीतीशी मुकाबला करण्यात अपुरा पडत आहे. भाजपने बहुतांश निवडणूक रोखे खरेदी केले आहेत. सत्ताधारी दलाला फायदा होण्याच्या दृष्टीने या योजनेचे नियोजन केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. अलीकडेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला राजस्थान आणि छत्तीसगडमधील सरकार वाचवता आले नाही. आता लोकसभा निवडणूक असून, पक्षाला जनतेला सोबत घेण्याबरोबरच निधीही उभारण्याचे आव्हान आहे. भाजपने काँग्रेसच्या ‘क्राऊड फंडिंग’ची खिल्ली उडवली आहे. ज्यांनी सहा दशके भारताला लुटले ते आता देणगी मागत आहेत, अशा शब्दांत टीकां केली आहे.
भाजपचे नेते अमित मालवीय म्हणाले, “काँग्रेसला दिलेला प्रत्येक पैसा राहुल गांधी यांच्या खिशात जाणार आहे. ते या पैशावर देश-विदेशात आरामात आयुष्य व्यतीत करतील.” येत्या काळात देणगी अभियानावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच राहणार, असे दिसते. राजकीय पक्षांनी नागरिकांकडून वर्गणी घेवोत अथवा धनदांडग्यांकडून; प्रश्न आहे तो या देणगीच्या पारदर्शकतेचा. त्याबाबत देशातील सर्वच पक्ष एकाच माळेचे मणी आहेत, हे जनता जाणून आहे.
Latest Marathi News राजकारण : काँग्रेस ‘हात’ का पसरतेय? Brought to You By : Bharat Live News Media.
