राष्ट्रीय : ‘मिशन 2024’ व्हाया राम मंदिर

योगेश मिश्र, राजकीय विश्लेषक, लखनौ
भारतीय जनता पक्षाने 2024 चे राजकीय युद्ध जिंकण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराच्या आधारे रणनीती आखली आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातून देशात राजकीय आघाडी मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न स्पष्टपणाने दिसत आहे. सुमारे पाच लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याची तयारी भाजपकडून केली जात आहे. यातून पक्षाला राजकीय बळकटी मिळण्याची आशा आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, पक्षाचे हे अभियान ‘गेमचेंजर’ म्हणून सिद्ध होऊ शकते. कारण ग्रामीण आणि तरुण मतदार हे निवडणुकीचा निकाल निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
भारतीय जनता पक्षाने अनेक वर्षांपासून आपल्या निवडणूक घोषणापत्रांमध्ये आणि जाहीर सभांमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीचा मुद्दा मांडला आहे. आता अयोध्येत 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने भाजपसाठी हा आश्वासनपूर्तीचा काळ आहे. साहजिकच यासाठी व्यापक अभियान हाती घेतले आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची आघाडी मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न स्पष्टपणाने दिसत आहे. 22 जानेवारीनंतर देशातील सर्वच 545 लोकसभा मतदासंघात पाच-पाच हजार नागरिकांना अयोध्येत आणण्याची तयारी केली जात आहे. रामलल्लांचे दर्शन घेऊ इच्छिणार्या नागरिकांची यादी तयार करण्याची जबाबदारी खासदार आणि आमदारांवर सोपविली आहे. पक्ष नेतृत्वाच्या मते, अयोध्येतून परतल्यानंतर नागरिक आपापल्या क्षेत्रात राम मंदिराची भव्यता सांगतील आणि त्यापासून पक्षाला व्यापक प्रमाणात फायदा मिळेल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.
सध्याच्या काळात भगवान रामलल्लाच्या प्रस्तावित प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे. अयोध्येवरून पक्षाने व्यापक प्रमाणात निवडणूक रणनीती आखली आहे. यानुसार देशात सर्व लोकसभा मतदार संघातून पाच-पाच हजार नागरिकांना वेगवेगळ्या तारखेला अयोध्येला आणले जाईल. यानुसार तीन महिन्यांत सुमारे एक कोटी नागरिकांना अयेाध्येत आणण्याचे ध्येय ठेवले आहे.
भाजप नेतृत्वाने या कामासाठी खासदार आणि आमदारांना हाताशी घेतले आहे. विविध मतदार संघातील यादी तयार करण्याची जबाबदारी खासदार आणि आमदारांवर सोपविली आहे. 23 जानेवारीनंतर विविध भागातील नागरिक अयोध्येत येण्यास सुरुवात होईल. दुर्गम भागातील भाविकांना अयोध्येत आणण्यासाठी रेल्वेची मदत घेतली जाणार आहे. भाविकांना राहण्याची आणि जेवणाचीदेखील सोय केली जाणार आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर विविध भागातून विशेष शंभर रेल्वे सोडण्याची तयारी होत आहे. 22 जानेवारीनंतर या रेल्वे सुमारे शंभर दिवस धावणार आहेत. प्राणप्रतिष्ठापनेनंतर मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत येतील, असा कयास बांधला जात आहे.
भाजप नेतृत्वाच्या अंदाजानुसार, अयोध्येतून परतणारे भाविक आपल्या मतदार संघात, भागात राहणार्या नागरिकांना राम मंदिराच्या भव्यतेची माहिती देतील. जे काम 500 वर्षांत होऊ शकले नाही ते पक्षाने, भाजपने करून दाखविले आहे, असाही संदेश सर्वत्र पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. अयोध्येत सध्या विकासासंबंधीचे प्रकल्प राबविले जात आहेत आणि अयोध्या दर्शन करून परतणारे नागरिक या विकास कामांची माहिती तळागळापर्यंत, सर्वांपर्यंत पोहोचवतील, असा पक्षाचा होरा आहे. साहजिकच, लोकसभेसह आगामी निवडणुकांमध्ये याचा लाभ मिळवण्याची रणनीती यामागे आहे. आपापल्या मतदार संघातील लोकांची नावे तयार करण्याचे काम अगोदरच सुरू झालेले आहे आणि त्यासाठी 15 जानेवारी डेडलाईन दिली आहे. विविध मतदार संघातील भाजपशी संबंधित नागरिकांनी वेगवेगळ्या भागात संपर्क अभियान सुरू केले आहे. राम जन्मभूमी ट्रस्टबरोबरच अयोध्या प्रशासनालाही संपर्क अभियानाची माहिती देत त्यानुसार नियोजन करण्याचे सांगितले आहे.
2024 च्या राजकीय युद्धाचे पडघम वाजत असताना भाजपने देशातील ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक गावापर्यंत जनसंपर्क अभियान सुरू करण्याची तयारी केली आहे. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबत राज्य भाजपला पत्र लिहून तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्रामीण भागाबरोबरच तरुण मतदारांनादेखील भाजपकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून 2024 चा राजकीय आखाडा जिंकून ‘हॅट्ट्रिक’ची तयारी सुरू आहे.
देशातील प्रत्येक गावांपर्यंत पक्षाचे काम पोहोचण्यासाठी पक्ष पातळीवर होमवर्क अगोदरच सुरू झालेले आहे. पक्षाने यासाठी देशभरातील सात लाख गावे निश्चित केली आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार देशातील गावांची संख्या ही सुमारे 6 लाख 40 हजार आहे. मात्र, भाजपने पक्षाच्या प्रचारात सुलभता राहावी यासाठी काही मोठ्या गावांची दोन भागात विभागणी केली आहे. गाव निश्चित करण्यासाठी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जनसंपर्क अभियान सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमाला ‘गाव गाव चलो अभियान’ असे नाव दिले आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सरकारच्या विविध विकास कामांची माहिती दिली जाणार आहे. ही मोहीम फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे आणि याप्रमाणे सर्व गावांतील अभियान पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
प्रत्येक गावासाठी भाजपच्या एका कार्यकर्त्याची नियुक्ती केली जाईल. गाव मोठे असेल तर अधिक संख्येने कार्यकर्त्यांची नियुक्ती होईल. पक्षाच्या या महत्त्वाकांक्षी अभियानात केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, पक्षाचे वरिष्ठ नेतेदेखील सामील होतील. पक्षाचे स्टार प्रचारक, मोठे चेहरेदेखील विविध गावांतील दौरा करून पक्षाची स्थिती आणखी बळकट करण्याचा प्रयत्न करतील. ग्रामीण मतदारांशी संपर्क साधण्याबरोबरच तरुणांना आणि प्रथमच मतदान करणार्या मतदारांशी संपर्क साधणे यावर पूर्णपणे लक्ष असणार आहे. ग्रामीण मतदारांपर्यंत जाण्याबरोबरच पक्षाच्या अध्यक्षांनी तरुण आणि पहिल्यांदा मतदान करणार्यांना आकर्षित करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
भाजपने 23 जानेवारी रोजी तरुणांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीचे आयोजन करण्याची जबाबदारी भाजपच्या युवा मोर्चा संघटनेवर सोपविली आहे. देशभरात पाच हजारांपेक्षा अधिक बैठका आयोजित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. देशभरात अशा पाच हजार बैठका बोलावण्यात येणार आहेत. राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी रोजी साजरा केला जाणार असून, तत्पूर्वी विविध बैठकांच्या माध्यमातून तरुण मतदारांना पक्षाशी जोडण्याचे अभियान सुरू होणार आहे. प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार्या किमान एक हजार तरुणांना बैठकीत सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार सुमारे पाच लाख तरुणांपर्यंत पोचण्याची तयारी भाजपकडून केली जात आहे. यातून पक्षाला राजकीय बळकटी मिळण्याची आशा आहे.
नव्वदीच्या दशकामध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन काढलेल्या यात्रेमुळे भाजपला केंद्रातील सत्ता मिळवण्यात यश आले होते. त्यानंतरच्या अडीच दशकांच्या काळात भाजप सत्तेपासून लांब राहिल्याने विरोधकांकडून सातत्याने भाजपला यावरून टीकेला सामोरे जावे लागले होते. तथापि, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आणि सत्ता नसल्याने भाजपपुढे ही टीका निमूटपणाने ऐकण्यावाचून पर्याय नव्हता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपच्या स्वप्नपूर्तीचे युग सुरू झाले. साहजिकच गेल्या तीन दशकांपासून हाती घेतलेल्या या मिशनच्या विजयाचा लोकोत्सव साजरा करत देशातील हिंदू मतांना पुन्हा नव्या क्षमतेने आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, पक्षाचे हे अभियान ‘गेमचेंजर’ म्हणून सिद्ध होऊ शकते. एका पाहणीनुसार 2014 मध्ये 43 टक्के हिंदूंनी भाजपला मतदान केले होते. 2019 मध्ये यामध्ये नऊ टक्क्यांची वाढ होऊन हा आकडा 52 टक्क्यांवर पोहोचला होता. मध्यंतरी घेतलेल्या एका सर्व्हेमध्ये 54 टक्के हिंदूंनी मोदी हे तिसर्यांदा पंतप्रधान व्हावेत, असे मत नोंदवले होते. आता 2024 मध्ये राम मंदिराच्या उभारणीनंतर भाजपला मिळणार्या हिंदू मतांचा आकडा 60 ते 65 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास भाजपची आधीच सुकर असणारी विजयाची वाट आणखी प्रशस्त बनणार आहे.
Latest Marathi News राष्ट्रीय : ‘मिशन 2024’ व्हाया राम मंदिर Brought to You By : Bharat Live News Media.
