बहार विशेष : नवी अंतराळ भरारी

डॉ. योगेश प्र. जाधव
नव्या वर्षात प्रक्षेपित करण्यात आलेला ‘एक्स्पोसॅट’ हा उपग्रह अनेकार्थांनी महत्त्वाचा आहे. जागतिक अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात भारत अमेरिकेच्या बरोबरीने दिमाखात उभा आहे. ‘एक्स्पोसॅट’चे यश भारताचे असले, तरी ते जगासाठी फलदायी ठरणार आहे. ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी अत्यंत कठोर मेहनतीने आणि प्रचंड प्रतिभेच्या आधारे सिद्ध केले आहे, की मनात आणल्यास कोणतेही लक्ष्य अशक्य नसते.
गत 2023 हे वर्ष भारतासाठी अनेकार्थांनी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद ठरले. अनेक क्षेत्रातील यशाने भारताचा जागतिक पटलावरील सन्मान वाढला. यामध्ये अंतराळ संशोधन क्षेत्र सर्वात आघाडीवर राहिले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने आपली चांद्रमोहीम-3 ज्या हिकमतीने आणि सुनियोजितपणाने यशस्वी करून दाखवली, त्याला अवघ्या जगाने सलाम केला. चांद्रभूमीवर दिमाखाने फडकणारा तिरंगा भारताच्या विज्ञान-तंत्रज्ञानातील भरारीची आणि या मातीतल्या प्रतिभावंत संशोधकांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारा आहे. चांद्रमोहिमेच्या यशानंतर ‘आदित्य’ मिशनद्वारे ‘इस्रो’ने सूर्याला गवसणी घालण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून, या मोहिमेच्या यशाचीही खात्री भारतीय अंतराळ संशोधकांना आहे.
अवकाश संशोधनाचे क्षेत्र हे अत्यंत उत्कंठावर्धक आणि रोमांचकारी असले, तरी त्यातील जोखीमही तितकीच मोठी असते. हजारो किलोमीटर दूर अंतराळामध्ये पाठवलेल्या यानाचे नियंत्रण करण्याचे तंत्रज्ञान विकसित झालेले असले, तरी या मोहिमेदरम्यान घडणारी एक छोटीशी चूक किंवा उणीव संपूर्ण मोहिमेवर पाणी टाकू शकते. पूर्वइतिहासातील घटनांवरून बोध घेऊन त्याचे व्यवस्थापन करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध होत असले, तरी विश्वाच्या अफाट पसार्यात आकस्मिक घडणार्या बदलांवर नियंत्रण मिळवण्याची क्षमता अद्याप मानवाकडे नाही. पराकोटीच्या जोखमीच्या आणि क्षणाक्षणांवर असणार्या धोक्यांनी भरलेल्या क्षेत्रात भारतीय अंतराळ संशोधक ज्या आत्मविश्वासाने यश मिळवत आहेत, ते केवळ उल्लेखनीयच नसून तमाम भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारे आहे. यशाची ही पताका नववर्षात अधिक उंचावत राहणार असल्याचे ‘इस्रो’च्या ताज्या ‘एक्स्पोसॅट’ मोहिमेने स्पष्ट केले आहे.
अवघे जग नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी करत होते, त्याचवेळी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथे एका नव्या अंतराळ मोहिमेचे काऊंटडाऊन सुरू होते. नव्या वर्षाच्या पहिल्या सकाळी 9.10 वाजता 44.4 मीटर लांबीचे भारीभक्कम रॉकेट ‘इस्रो’ने आकाशात सोडले आणि काही वेळातच पृथ्वीपासून 650 किलोमीटर अंतरावर ‘एक्स्पोसॅट’ नावाचा उपग्रह स्थापन करत नवा इतिहास रचला गेला. ‘एक्स्पोसॅट’चे वजन 469 किलोग्रॅम इतके असून, त्याची उंची 44.4 मीटर आहे. हा उपग्रह 500 ते 700 किलोमीटर उंचीवर पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थापित करण्यात येणार आहे.
उपग्रह प्रक्षेपित करणे आणि त्याला एखाद्या कक्षेत स्थापन करणे ही बाब ‘इस्रो’साठी आता नवी राहिलेली नाही. उलटपक्षी आजघडीला अंतराळामध्ये यशस्वीपणे आणि तुलनेने कमी खर्चामध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या बाबतीत ‘इस्रो’ ही जगातील सर्वात विश्वसनीय संस्था म्हणून पुढे आली आहे. त्यामुळेच आज जगभरातील विविध देशांकडून त्यांचे उपग्रह अंतराळामध्ये सोडण्यासाठी ‘इस्रो’ची मदत घेतली जाते. 2014 ते मार्च 2023 या नऊ वर्षांच्या काळात ‘इस्रो’ने 388 विदेशी उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले आहेत. यापैकी एकट्या 2017 या वर्षात 130 विविध देशांचे उपग्रह ‘इस्रो’मार्फत अवकाशामध्ये स्थापित झाले. ‘यशाची गॅरंटी’ ही ‘इस्रो’ची खासियत बनलेली आहे. नव्या वर्षात प्रक्षेपित करण्यात आलेला ‘एक्स्पोसॅट’ हा उपग्रह अनेकार्थांनी महत्त्वाचा आहे. शास्त्रीय अभ्यासासाठी सोडलेला हा उपग्रह खगोलशास्त्रातील भारताचे प्रावीण्य आणि महत्त्वाकांक्षा या दोन्ही गोष्टी सांगतो. अशा प्रकारचा उपग्रह केवळ अमेरिकेकडे असून, यावरून भारताचे यश लक्षात येऊ शकेल.
‘एक्स्पोसॅट’वर बसवलेली दोन महत्त्वाची उपकरणे आणि त्यांद्वारे अवकाशातील क्ष-किरणांच्या उगमांच्या स्रोतांचा केला जाणारा अभ्यास हे या मोहिमेचे बलस्थान आहे. ‘पोलॅरिमीटर इन्स्ट्रुमेंट इन एक्सरेज’ किंवा ‘पोलिक्स’ आणि ‘एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपी अँड टायमिंग’ (एक्सपेक्ट) अशी या उपकरणांची नावे आहेत. या दोन्ही पेलोडद्वारे ब्लॅक होल्स म्हणजेच कृष्णविवरांबरोबरच न्यूट्रॉन तार्यांचे सखोल निरीक्षण केले जाणार आहे. यातून जगभरातील अवकाश संशोधनासाठी माहितीचे नवे भांडार उपलब्ध होणार आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने ‘इमॅजिंग एक्सरेज पोलॅरिमीटर’ नावाने अशाच प्रकारची मोहीम राबवली होती. सुपरनोव्हा स्फोटाचे अवशेष, कृष्णविवरांमधून बाहेर पडणार्या कणांचे प्रवाह आणि इतर खगोलीय घटनांवर या मोहिमेद्वारे अभ्यास केला होता. सद्यस्थितीत जगात केवळ अमेरिका आणि भारत या दोनच देशांनी अशा प्रकारच्या मोहिमा राबवल्या आहेत. ब्रह्मांडाच्या पसार्यातील रहस्ये शोधणारी ‘इस्रो’ची ही गेल्या वर्षभराच्या काळातील तिसरी मोहीम आहे. ‘एक्स्पोसॅट’ मोहिमेचे आयुष्य सुमारे पाच वर्षांचे असणार आहे. अंतराळ संशोधकांसाठी ‘एक्स्पोसॅट’ ही एक प्रकारची वेधशाळा म्हणून उपयुक्त ठरणार आहे.
अंतराळात सोडलेल्या उपग्रहांचा विचार करता टेलिव्हिजन प्रसारणाला मदत करणारे, जीपीएस सेवा देणारे, हवामानाचा अंदाज सांगणारे, सीमेची देखरेख करणारे, शहर, खेडे, शेती, पीकपाण्याची, नद्यांची स्थिती सांगणारे असे अनेक उपग्रह अवकाशात फिरत आहेत. परंतु, ‘एक्स्पोसॅट’ हा वेगळ्या प्रकारचा उपग्रह आहे. त्याची निर्मिती निव्वळ खगोलशास्त्रीय अभ्यासाठीच केली आहे. त्याचा थेट लाभ शास्त्रज्ञांना आणि खगोलशास्त्र-भौतिक शास्त्रातील शास्त्रज्ञांना मिळणार आहे. कृष्णविवरांच्या अभ्यासातून ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि पृथ्वीला अवकाशात असणारे संभाव्य धोके ओळखण्यासाठी मदत मिळणार आहे. 1996 मध्ये भारतीय एक्स्ट्रोनॉमीचा प्रयोग करण्यात आला होता. हा उपग्रह म्हणजे त्यापुढचे पाऊल आहे.
2004 मध्ये ‘इस्रो’ने ‘अॅस्ट्रोसॅट’ नावाचा उपग्रह सोडण्याची तयारी केली होती आणि हा उपग्रह 2015 मध्ये सोडण्यात आला. अवकाशाच्या अभ्यासासाठी तयार केलेला हा भारताचा पहिला उपग्रह होता. ‘एक्स्पोसॅट’ हा या श्रेणीतील पुढचे पाऊल आहे. यावरून भारताच्या उपग्रह कार्यक्रमातील सातत्य लक्षात येते. भारत ‘अॅस्ट्रोसॅट’कडून मिळणार्या माहितीचा वापर सर्वांसाठी करणार आहे. प्रत्येकाने आपापल्यापरीने त्याचे विश्लेषण करावे, हा यामागचा हेतू आहे. ज्ञान आणि विज्ञान हे सर्वांसाठी आहे आणि ते आदान-प्रदान केल्यानेच वाढणारे आहे, ही भारताची भूमिका आहे. ‘एक्स्पोसॅट’बाबतही ती कायम आहे. या मोहिमेतून मिळणारी माहिती, उलगडणारी रहस्ये सर्वांसाठी खुली असणार आहेत. त्यामुळे ‘एक्स्पोसॅट’चे यश भारताचे असले, तरी ते जगासाठी फलदायी ठरणार आहे.
‘एक्स्पोसॅट’ हा उपग्रह पल्सर, ब्लॅक होल एक्स-रे बायनरी, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, नॉन-थर्मल सुपरनोव्हा यांसारख्या विश्वातील 50 तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणार आहे. 2017 मध्ये हाती घेतलेल्या या मोहिमेसाठीचा खर्च सुमारे 250 कोटी रुपये इतका आहे. विशेष म्हणजे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने राबवलेल्या मोहिमेचा खर्च 188 दशलक्ष डॉलर्स इतका होता. तसेच या मिशनचे आयुष्यमान दोन वर्षेच होते. यावरून ‘इस्रो’च्या मोहिमांचे वेगळेपण लक्षात येते.
‘पोलिक्स’ हा या उपग्रहाचा मुख्य पेलोड रमण संशोधन संस्था आणि यूआर राव सॅटेलाईट सेंटर यांनी संयुक्तपणे तयार केलेला आहे. 126 किलो वजनाचे हे उपकरण अवकाशातील स्रोतांचे चुंबकीय क्षेत्र, रेडिएशन, इलेक्ट्रॉन इत्यादींचा अभ्यास करणार आहे. जेव्हा मोठ्या तार्यांची ऊर्जा संपून जाते, तेव्हा ते गुरुत्वाकर्षणामुळे कोसळतात. ते आपल्यामागे ब्लॅक होल, न्यूट्रॉनचे तारे सोडून जातात. एक्स-रे फोटॉन आणि पोलरायजेशनचा वापर करून ‘एक्स्पोसॅट’ ब्लॅक होल आणि न्यूट्रॉन तार्यांच्या रेडिएशनचा अभ्यास करण्यासाठी मदत करेल. ब्रह्मांडात ब्लॅक होलचे गुरुत्वाकर्षण बल सर्वाधिक आहे. याबाबत अधिक माहिती मिशनच्या माध्यमातून एकत्रित केली जाईल. हे मिशन भारताच्या अंतराळ संशोधन आणि विकास प्रयत्नांना एक मोठे व्यासपीठ प्रदान करेल.
‘एक्स्पोसॅट’मधील ‘पी-30’ या सूक्ष्म उपग्रहाच्या प्लॅटफॉर्मची कार्यक्षमता आणि प्रणालीचे प्रमाणीकरण करण्यासाठी हैदराबादस्थित ध्रुव स्पेस हे ‘स्टार्टअप’ मदत करणार आहे. प्रथमच एका भारतीय ‘स्टार्टअप’ने अंतराळ मोहिमेसाठी सॉफ्टवेअर आधारित प्रणाली विकसित केली आहे. याखेरीज या मोहिमेमध्ये मुंबईस्थित के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा हौशी रेडिओ उपग्रह ‘बिलीफसॅट-0’चा सहभाग आहे. ‘इस्रो’च्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधील फ्युएल सेल पॉवर सिस्टीम आणि सिलिकॉन-आधारित ‘हाय एनर्जी सेल’ हे दोन पेलोड, तसेच अहमदाबादस्थित भौतिक संशोधन प्रयोगशाळेत ग्रहांवरील धूलिकणांची संख्या मोजण्यासाठी डिझाईन केलेले ‘डस्ट एक्सपेरिमेंट’देखील या मोहिमेचा भाग आहेत. याखेरीज तिरुअनंतपूरमस्थित ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर वूमेन’ने विकसित केलेला एक उपग्रहदेखील ‘एक्स्पोसॅट’बरोबर प्रक्षेपित करण्यात आला आहे. सौर विकिरण आणि अतिनील किरणांचा निर्देशांक मोजणे हा या उपग्रहाचा उद्देश आहे.
‘एक्स्पोसॅट’च्या निमित्ताने वर्कहॉर्स, पीएसएलव्हीचे 60 वे प्रक्षेपण झाले आहे. ही रॉकेटप्रणाली जागतिक परिस्थितीत सर्वात विश्वासार्ह आणि किफायतशीर प्रणाली म्हणून विकसित झाली आहे. याच्या यशाचा दर 95 टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या काही वर्षांतला आलेख पाहिल्यास ‘इस्रो’ ही अशी संस्था झाली आहे, जिने यशाची देशाला सवयच लावली आहे. यशस्विता हा आता ‘इस्रो’चा एक नियम बनून गेला आहे आणि अपयश हे अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या वेळीच पाहावे लागते. खासगी आणि सरकारी क्षेत्रातील जेवढ्या अंतरिक्ष संशोधन संस्था जगभरात आहेत, त्यात ‘इस्रो’चा यशस्वितेचा दर सर्वाधिक आहे. त्यामुळेच आजच्या घडीला ‘इस्रो’ची गणना जगातील सर्वोत्कृष्ट आणि यशस्वी अंतरिक्ष संस्थांमध्ये केली जाते. भारत हा अंतरिक्ष क्षेत्रातील सर्वात मोठी ताकद ठरण्याचा दिवस आता फार दूर नाही.
अंतराळ विज्ञानाची सुरुवात झाली, त्या काळात रशियाचा या क्षेत्रात दबदबा होता. ‘स्पुटनिक’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडून रशियाने तो निर्माण केला होता. परंतु अमेरिकेने चंद्रावर माणसाला पाठवून सोव्हिएत रशियाला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर अनेक वर्षे या अंतरिक्ष विज्ञानाच्या क्षेत्रात रशिया आणि अमेरिकेत चढाओढ सुरू होती. भारताला रशियाशी असलेल्या मैत्रीमुळे अंतरिक्ष तंत्रज्ञान मिळाले. परंतु, अंतरिक्षावर केवळ आपलाच कब्जा असावा, या उद्देशाने अमेरिकेने भारताच्या प्रयत्नांमध्ये खोडा घातला. त्याला भीक न घालता भारताने स्वतःचे क्रायोजेनिक इंजिन तयार केले. ‘नासा’पेक्षा कमी खर्चात उपग्रहांचे प्रक्षेपण करून भारताने अमेरिकेला चोख उत्तर दिले आणि भारतीय शास्त्रज्ञ कुठेही कमी पडणार नाहीत, हे दाखवून दिले. ‘एक्स्पोसॅट’च्या प्रक्षेपणानंतर भारत अमेरिकेच्या बरोबरीने जागतिक अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात दिमाखात उभा आहे. अमेरिकेसह अनेक बडे देश भारताबरोबर व्यावसायिक करार करण्यास इच्छुक आहेत. ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी अत्यंत कठोर मेहनतीने आणि प्रचंड प्रतिभेच्या आधारे सिद्ध केले आहे, की मनात आणल्यास कोणतेही लक्ष्य अशक्य नसते. प्रयत्नांत सातत्य ठेवल्यास कोणतेही लक्ष्य साध्य करता येते, याचा धडा भारतीयांनी ‘इस्रो’कडून घ्यायला हवा….
Latest Marathi News बहार विशेष : नवी अंतराळ भरारी Brought to You By : Bharat Live News Media.
