पुण्यातील नामचीन टोळीची सांगलीत पार्टी

सचिन लाड
सांगली : खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी वसुली अशा गंभीर गुन्ह्यांची मालिका रचून राज्यातील गुन्हेगारी जगतात चर्चेत असलेली पुण्यातील खतरनाक टोळी सांगलीत दाखल झाली आहे. या टोळीने स्थानिक तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या भेटीगाठी घेतल्या. एका हॉटेलमध्ये त्यांची जंगी ‘पार्टी’ही रंगली. सांगलीतील गुन्हेगारांनी या टोळीचे जल्लोषात स्वागत केले. ‘पार्टी’साठी सांगलीत शहरातील व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दोन गुंडांचे वाढदिवस होते. या गुंडांनी स्वत:च्या शुभेच्छांचे फलक लावण्याचा प्रयत्न केला. पण पोलिस कारवाईचा ससेमिरा मागे नको, म्हणून त्यांनी फलक लावण्याचे टाळले. पुण्यातील ही नामचीन टोळी चार आलिशान कारमधून सांगलीत आली. टोळीचा म्होरक्याही होता. टोळीतील पंचवीसभर साथीदार सोबत होते.
सांगलीवाडीत स्वागत
सांगलीवाडीतील टोलनाक्यावर या टोळीचे फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषात स्वागत केले. तेथून ही टोळी एका हॉटेलमध्ये गेली. तिथे सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार हजर होते. तेथे पुणे व सांगली शहरातील गुन्हेगारीबाबत चर्चा झाल्याचे एका विश्वसनीय सूत्राने सांगितले.
नव्याने मोट बांधली!
सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारांची नव्याने मोट बांधण्यासाठी या टोळीचा दौरा होता, असे समजले. हत्यारांची तस्करी करून ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगारी करण्यावर भर देण्याबाबत टोळीच्या म्होरक्याने सुचविले. खंडणी वसुली, जागेचा वाद, सावकारी वसुली ही कामे घेऊन गुन्हेगारी जगतात कमालीचा दबदबा निर्माण करा, असेही या म्होरक्याने सांगितल्याचे समजते. शहरात गेल्या 20 वर्षांत अनेक टोळ्यांनी दहशत निर्माण केली आहे. आपलेच वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी या टोळ्यांनी प्रतिस्पर्धी टोळीतील अनेक साथीदारांची ‘गेम’ केली आहे.
दोन डझनभर गुंडांची गेम!
सातत्याने बदला घेण्याच्या संघर्षातून दोन ‘डझन’हून अधिक गुंडांची गेम झाली आहे. एकमेकांचा बदला घेण्यासाठी या टोळ्या सुडाने पेटल्या. काही वर्षांपूर्वी शहरातील एक टोळी कराडमधील गुंड सलीम शेख व ऊर्फ सल्या चेप्याच्या संपर्कात गेली. सल्याचा सांगलीतील एका खुनात सहभाग होता. ज्या गुंडाचा वाढदिवस होता, त्याने आपला जिल्ह्यातील गुन्हेगारीत दबदबा निर्माण करण्यासाठी पुण्यातील टोळीला सांगलीत येण्याचे आमंत्रण दिले होते. ही टोळी मिरजेलाही जाऊन आली. रात्री उशिरा ती पुण्याला रवाना झाली.
संजयनगरच्या गुंडाची कवलापुरात पार्टी
खून, खुनाचा प्रयत्न असे 22 हून अधिक गुन्हे दाखल असलेला संजयनगरचा गुंड काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला आहे. त्याने कर्नाटकात गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. तिथे त्याला साथीदारांसह अटक केली. गेल्या आठवड्यात तो जामिनावर बाहेर आला. तिथून त्याने त्याच्या कवलापूर (ता. मिरज) येथील साथीदारांकडे काही वेळ आश्रय घेतला. तिथे त्याने पार्टी केल्याची चर्चा आहे.
Latest Marathi News पुण्यातील नामचीन टोळीची सांगलीत पार्टी Brought to You By : Bharat Live News Media.
