ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; भाजपची मागणी

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : पश्चिम बंगालमध्ये जंगलराज सुरू आहे. कायदा सुव्यवस्थेची पायमल्ली होत असताना ममता बॅनर्जी त्याचा आनंद घेत आहेत, पश्चिम बंगालमध्ये लोकशाही संपली आहे. ममता बॅनर्जींनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. अशी जळजळीत टीका भाजपच्या वतीने करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर काही लोकांनी हल्ला केला. हा हल्ला तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी केला म्हणत भाजपने यावर आगपाखड केली.
पश्चिम बंगालमध्ये रेशन घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान आणि अन्य एका नेत्याच्या घरी छापे टाकण्यासाठी ईडीचे पथक आले होते. त्यावेळी या पथकावर हल्ला करण्यात आला. सरकार म्हणून कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सरकारची असताना ममता बॅनर्जी यांच्या राज्यात असे प्रकार होत आहेत. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर, त्यांच्या चमूवर हल्ले होत आहेत. हल्ले करणाऱ्या गुंडांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे संरक्षण आहे. म्हणून अशा प्रकारचे हल्ले होत आहेत, असा गंभीर आरोपही भाजपने केला.
ममता बॅनर्जी यांना या हल्ल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणीही भाजपच्या वतीने करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेत ही टीका केली. तसेच ही लढाई कायदा विरुद्ध ममता बॅनर्जींचे गुंड अशी आहे. यात कायदा जिंकेल, असेही ते म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये लोकशाही संपली आहे. संविधान आणि कायद्याची भीती राहिली नाही. मुख्यमंत्री कायद्याच्या रक्षकांसोबत नव्हे तर गुंडांसोबत उभ्या राहतात. ममता बॅनर्जी अराजकतेच्या मूर्ती आहेत. अशीही टीका त्यांनी केली. यापूर्वी सीबीआयचे अधिकारी पश्चिम बंगालमध्ये तपासासाठी गेले असताना त्यांना खोलीत डांबण्यात आले होते, याचाही उल्लेख त्यांनी केला. इंडिया आघाडीतील नेते हे स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजतात. त्यामुळे हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल यांना वारंवार समन्स बजावून ते चौकशीसाठी हजर होत नाहीत. असेही ते म्हणाले.
हेही वाचा :
आपचे बडे नेते काँग्रेसमध्ये, काँग्रेस विरुद्ध आप जुंपण्याची शक्यता
दानवेंच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात ठाकरे-फडणवीसांनी समोरासमोर येण्याचे टाळले
नंदुरबार : श्रीरामांविषयी वक्तव्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार
Latest Marathi News ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; भाजपची मागणी Brought to You By : Bharat Live News Media.
