अयोध्येतील विमानतळचे नाव आता ‘महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ!
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : Ayodhya Airport : अयोध्येत नव्याने बांधलेल्या विमानतळाला ‘महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्याधाम’ असे नाव देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३० डिसेंबरला विमानतळाचे उद्घाटन केले होते.
परदेशी भाविक आणि पर्यटकांसाठी अयोध्येचे जागतिक तीर्थक्षेत्र म्हणून महत्त्व निर्माण करण्याच्या आणि आर्थिक क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याच्या दृष्टीकोनातून अयोध्या विमानतळाच्या दर्जात वाढ करून त्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देणे महत्त्वाचे आहे. या विमानतळाला महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम हे नाव देणे म्हणजे रामायण महाकाव्य रचणाऱ्या महर्षी वाल्मिकी ऋषींना अभिवादन आहे. तसेच विमानतळाच्या ओळखीमध्ये सांस्कृतिक भर पडत आहे. असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, अयोध्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवण्याच्या निर्णयामुळे या भागाचा आर्थिक विकास होईल. परदेशी यात्रेकरू आणि पर्यटकांच्या आगमनाने जागतिक तीर्थक्षेत्र म्हणून अयोध्येचे महत्त्व वाढेल. असेही ते म्हणाले.
यासोबतच मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि मॉरिशस रिसर्च अँड इनोव्हेशन कौन्सिल यांच्यातील संयुक्त लघु उपग्रहाच्या विकासामधील सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला मंजुरी देणे, हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहकार्याबाबत भारत आणि गयाना यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणे, तसेच शुन्य कार्बन उत्सर्जन ध्येय साध्य करण्याकरिता भारतीय रेल्वेच्या मदतीसाठी भारत आणि युनायटेड स्टेट्स फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट यांच्यात सामंजस्य कराराला मान्यता देणे या निर्णयांसह ‘पृथ्वी विज्ञान’ या व्यापक योजनेला मंजुरी देण्यात आली.
Latest Marathi News अयोध्येतील विमानतळचे नाव आता ‘महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ! Brought to You By : Bharat Live News Media.