पिंपरी : तरुणांमध्येही डोळ्यांच्या आजारात वाढ : दीपेश सुराणा
दीपेश सुराणा
पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : मोबाईल आणि संगणकाचा अतिवापर लहान मुलांबरोबरच तरुणांच्या डोळ्याच्या वाढत्या आजाराला देखील कारणीभूत ठरत आहे. सहा मुलांमागे एका मुलाला चष्मा लागत असल्याचे निरीक्षण नेत्रतज्ज्ञांनी मांडले आहे. तर, तरुणांमध्ये डोळ्यांची अॅलर्जी, डोळे कोरडे होणे, डोळ्यांना इन्फेक्शन होणे अशा समस्या जाणवत आहेत. माहिती तंत्रज्ञानातील क्षेत्रातील कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्या तसेच विविध कार्यालयांमध्ये बैठ्या स्वरुपाचे काम असते. संगणकासमोर तासनतास बसुन कर्मचार्यांना काम करावे लागते.
त्यामुळे त्याचा डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कॉम्प्युटर आय सिंड्रोम यासारख्या आजाराबरोबरच डोळ्यांतुन पाणी येणे, डोळे कोरडे होणे असे त्रास संभवतात. मुलांकडून मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड आदींचा वापर वाढला आहे. मुलांचा वाढलेला स्क्रीन टाईम त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. त्यांना लहान वयातच चष्मा लागत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात डोळ्यांच्या समस्येने त्रस्त रुग्णांचे प्रमाण दररोज शंभरपेक्षा अधिक असल्याचे आढळत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये देखील डोळे तपासणीसाठी येणार्या रुग्णांचे प्रमाणे जास्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
वाढत्या प्रदूषणामुळे समस्येत वाढ
शहरातील वातावरणात वाढलेले प्रदूषण देखील डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ करत आहे. इमारतींचे बांधकाम, रस्ते, पदपथ, उड्डाणपूल आदी कामांमुळे निर्माण होणारी धूळ डोळ्यात गेल्याने डोळ्यांना अॅलर्जीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे डोळे चोळले गेल्याने डोळ्यांना इन्फेक्शन होते.
दर सहा मुलांमागे एकाला चष्मा लागत असल्याचे सध्या निरीक्षण आहे. तर, तरुणांनाही प्लस क्रमांकाचे चष्मे लागत आहेत. रुग्णालयात तपासणीसाठी येणार्या रुग्णांमध्ये डोळ्यांच्या समस्येने त्रस्त रुग्णांचे प्रमाण हे दररोज शंभरपेक्षा अधिक असल्याचे आढळत आहे. वाढता स्क्रीनटाईम, वातावरणातील प्रदूषण यामुळे डोळ्यांशी संबंधित विविध समस्यांना रुग्णांना सामोरे जावे लागत आहे.
– डॉ. अंजली कुलकर्णी, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक
हेही वाचा
श्रीरामांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवले ! जितेंद्र आव्हाडांवर पुण्यात गुन्हा दाखल
रायगड: पोलीस उपअधीक्षक संजय सावंत यांचा राजस्थानमध्ये अपघातात मृत्यू
Closing Bell | IT चा बाजाराला सपोर्ट! सेन्सेक्स ७२ हजार पार, कोणते शेअर्स वधारले?
Latest Marathi News पिंपरी : तरुणांमध्येही डोळ्यांच्या आजारात वाढ : दीपेश सुराणा Brought to You By : Bharat Live News Media.