Pimpari : ‘कॉन्स्ट्रो’मुळे शहराच्या लौकिकात भर : राहुल महिवाल
पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : कॉन्स्ट्रो एक्स्पोमुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगराच्या लौकिकात भर पडत आहे. चीन आणि इतर देशांपेक्षा अधिक चांगल्या सुविधा, तंत्रज्ञान आपल्याकडे आहे. आपण जागतिक स्पर्धेत सरस असल्याचे अशा प्रदर्शनांमधून दिसून येते, असे मत पुणे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी गुरुवारी (दि. 4) व्यक्त केले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मोशी येथील अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र (पीआयईसीसी) येथे कॉन्स्ट्रो-2024 या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचे 4 ते 7 जानेवारी दरम्यान आयोजन केले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 अशी प्रदर्शनाची वेळ आहे.
पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास अवचट यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी महिवाल बोलत होते. वास्तू विशारद विलास अवचट, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, ’कॉन्स्ट्रो’चे अध्यक्ष जयंत इनामदार, पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च फाउंडेशनचे (पीसीईआरएफ) अध्यक्ष नरेन कोठारी, सचिव शिरीष केंभवी, संजय वायचळ आदी उपस्थित होते.
शहरात विविध प्रकल्पांचे काम सुरू
राहुल महिवाल म्हणाले, की पुणे महानगर क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये पीएमआरडीएचा रिंगरोड, नदीसुधार प्रकल्प, माण-शिवाजीनगर मेट्रो यासह विविध प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यामध्ये बांधकाम क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील संशोधन, नवतंत्रज्ञान, कार्यप्रणाली यांची सांगड घालणे गरजेचे आहे. कॉन्स्ट्रो प्रदर्शन त्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे. जयंत इनामदार म्हणाले, की अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योगांना एकाच छताखाली आणण्याचे काम कॉन्स्ट्रोच्या माध्यमातून केले आहे. बांधकाम उद्योगातील अद्ययावत यंत्रसामग्री, साहित्य, पद्धती आणि तंत्रज्ञान यांचा प्रदर्शनात समावेश आहे.
बांधकाम तंत्रज्ञानातील आधुनिकता ही यंदाच्या प्रदर्शनाची संकल्पना आहे. प्रदर्शनामध्ये एमआयटी, व्हीआयटी, महर्षी कर्वे शिक्षण संस्था यांचे आर्किटेक्चर कॉलेज आदी शैक्षणिक संस्थांचादेखील सहभाग आहे. नरेन कोठारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
250 स्टॉल्सचा समावेश
पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आयोजित प्रदर्शनाची ही 18 वी मालिका आहे. 30 हजार चौ. मी. जागेवर प्रदर्शन भरविले आहे. त्यामध्ये 250 स्टॉल्सचा समावेश आहे. या प्रदर्शनासाठी पीएमआरडीए कन्सेप्ट पार्टनर तर पिंपरी-चिंचवड महापालिका सहयोगी भागीदार आहे.
हेही वाचा
श्रीरामांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवले ! जितेंद्र आव्हाडांवर पुण्यात गुन्हा दाखल
Jalgaon News | राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करा : गुलाबराव पाटील
लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिर : फडणवीस राहणार उपस्थित
Latest Marathi News Pimpari : ‘कॉन्स्ट्रो’मुळे शहराच्या लौकिकात भर : राहुल महिवाल Brought to You By : Bharat Live News Media.