पिंपरी : पालिका स्वत: राबविणार पे अॅण्ड पार्क योजना
पिंपरी : सुरुवातीपासून नागरिकांचा विरोध असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात सशुल्क वाहनतळ (पे अॅण्ड पार्क) योजना सुरू केली. नागरिकांना विश्वासात न घेणे, महापालिका प्रशासनाचा अतिआत्मविश्वास, वाहतूक पोलिसांचे असहकार, वाहनचालकांचा अल्प प्रतिसाद, तयारी न करता पुणे शहराची नक्कल करणे व इतर कारणामुंळे ही योजना मोठा खर्च करूनही गुंडाळण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढविली. आता महापालिका स्वत: ही योजना राबविणार आहे. त्याला कितपत यश मिळते, हे लवकरच स्पष्ट होईल.
1 जुलै 2021 पासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर पे अॅण्ड पार्क योजना सुरू करण्यात आली. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर हे त्यासाठी खूपच आग्रही होते. शहरातील 396 ठिकाणी पे अॅण्ड पार्क योजना सुरू करण्यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च करीत रस्ते रंगरंगोटीसह शेकडो सूचना फलक लावले. वाहतूक पोलिसांना टोईंग व्हॅन देण्यात आल्या. शहरातील काही ठिकाणी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली. नगरच्या निर्मला ऑटो केअर या ठेकेदाराला हे काम तीन वर्षे कालावधीसाठी देण्यात आले.
मात्र, वाहनचालक शुल्क देत नसून, शिवीगाळ व दादागिरी करीत असल्याचे प्रकार समोर आले. तसेच, वाहतूक पोलिसांकडून नो पार्किंगमधील वाहनांवर सातत्याने कारवाई होत नाही. त्यामुळे वाहनचालक कोठेही वाहन लावून निघून जातात. दुसरीकडे, अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांचा उत्साह मावळला. परिणामी, ही योजना शहरातील अनेक भागांतून गुंडाळण्यात आली. अखेर, ठेकेदाराने काम बंद करण्याबाबत आयुक्तांना पत्र पाठविले.
वाहनचालकांसाठी मोबाईल अॅप तयार करून, पे अॅण्ड पार्क योजना करारनाम्यानुसार 3 वर्षे सुरू ठेवण्याबाबत आयुक्तांनी ठेकेदाराला सूचना केली. त्यानुसार शहरातील मोजक्याच रस्त्यांवर शुल्क वसुली सुरू आहे. मात्र, त्याला प्रतिसाद अल्प आहे. वाहनचालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. अनेक वाहनचालक शुल्क देत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नव्याने सुरू केलेली ही योजना पुन्हा गंटागळ्या खात सुरू आहे. ही योजना जास्त दिवस तग धरू शकली नाही.
जवळजवळ ही योजना बंद पडली आहे. महापालिकेस ही योजना गुंडाळावी लागी. आता, महापालिका स्वत: ही योजना राबविणार आहे. त्यातून दरवर्षी कोट्यवधीचे उत्पन्न मिळणार असून, महापालिकेचे कर्मचारी त्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत. हे काम क्षेत्रीय कार्यालयानुसार केले चालणार आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाने केला आहे.
स्मार्ट सिटीची घोषणा फोल
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने शहरातील अनेक भागात स्मार्ट पार्किंग सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. स्मार्ट सिटीची मुदत संपली तरी, अद्याप एकही स्मार्ट पार्किंग सुरू करता आलेले नाही. तसेच, स्मार्ट ट्रॅफींग अॅप विकसित करण्यात येणार होते. त्याचाही अद्याप पत्ता नाही.
महापालिकेचा लाखोंचा खर्च वाया
पे अॅण्ड पार्क योजनेसाठी महापालिकेने 396 ठिकाणी पांढरे पट्टे रंगविले. तसेच, नो पार्किंग, पार्किंग असे शेकडो सूचना फलक लावले. त्यावर 45 लाखांपेक्षा अधिकचा खर्च करण्यात आला. तसेच, वाहतूक पोलिसांना नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅन उपलब्ध करून दिली. त्यावर महापालिकेने लाखो रुपयांचा खर्च केला. सध्या अनेक फलक गायब झाले आहेत. खोदकाम व डांबरीकरण झाल्याने काही रस्त्यांवरील पांढरे पट्टे दिसत नाहीत. महापालिकेने केलेला हा खर्च वाया गेला आहे.
अधिकार्यांची धरसोड वृत्ती
महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाने ही योजना नागरिकांचा विरोध असतानाही सुरू ठेवली. काही रस्त्यांवर वाहनचालकांकडून प्रतिसाद मिळत असल्याने काही रस्त्यांवर ठेकेदाराने शुल्क वसुली सुरू ठेवली. मात्र, पुढे काही दिवसांत तेथेही प्रतिसाद मिळणे बंद झाले. योजना गुंडाळल्यानंतर पुन्हा ठेकेदाराला ती सुरू करण्यास सांगण्यात आले. असे तीन ते चार वेळा झाले. असे असताना अधिकारी आपली चूक व अपयश मान्य करीत नसल्याचे चित्र आहे.
आयुक्तांच्या मंजुरीने महापालिका स्वत: योजना राबविणार
पे अॅण्ड पार्क योजना ठेकेदाराला यशस्वीपणे राबविता आली नाही. महापालिकेस दरमहा मोठे उत्पन्न मिळणार असल्याने महापालिका ही योजना स्वत: राबविणार आहे. त्यासाठी महापालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील अहवाल तयार करून आयुक्तांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा
गाळ उपसण्यावरून मारहाण; 13 जणांना कारावास, दंड
Jalgaon News | जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : गुलाबराव पाटील
Janhvi Kapoor : सिंपल लूकमध्ये जान्हवी तिरुपतीच्या दर्शनाला (video)
Latest Marathi News पिंपरी : पालिका स्वत: राबविणार पे अॅण्ड पार्क योजना Brought to You By : Bharat Live News Media.