घरात सापडली चंदेरी ब्रीफकेस, आत होते…

लंडन : जुन्या घरांमध्ये राहायला गेलेल्या अनेक कुटुंबांना संबंधित घरात काही धक्कादायक गोष्टी आढळल्याची अनेक उदाहरणे आहेत. कुणाला स्वयंपाकघराच्या खाली गुप्त खोलीच आढळते, तर कुणाला चक्क विहीर! कुणाला जुनी कागदपत्रे आढळतात, तर कुणाला मौल्यवान वस्तू. घराची साफसफाई करत असताना अशा जुन्या वस्तू सापडतात; पण एका कुटुंबाला त्यांच्या घरात असे काही सापडले की, त्यांना थेट घर सोडून धूम ठोकावी लागली!
घराची साफसफाई करत असताना या कुटुंबाला एक गुप्त दरवाजा दिसला. हे दार उघडल्यावर आत त्यांना एक जुनी ब्रीफकेस दिसली. ही ब्रीफकेस उघडताच घर सोडण्याची वेळ आली. या महिलेने तिची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने सांगितले की, हे घर सुमारे 60 वर्षांपूर्वी बांधले गेले होते. नुकतेच आम्ही ते विकत घेतले आणि त्याचे नूतनीकरण केले. साफसफाई करत असताना एक गुप्त दरवाजा पाहून आम्हाला धक्काच बसला. ते उघडले असता आत एक चंदेरी रंगाची सुटकेस दिसली.
सुरुवातीला असे वाटले की, ती खूप मौल्यवान असेल, म्हणून कदाचित घरमालकाने ती लपवून ठेवली असेल आणि मग ते ही सुटकेस सोबत नेण्यास विसरले असतील. आम्ही जेव्हा तपासले तेव्हा आम्हाला कळाले की, ती सुटकेस रिमोवा ब्रँडची आहे. गुगल केल्यानंतर समजले की त्या सुटकेसचा खरा मालक लुई वुईटन आहेत. हे पाहून मला खूप आनंद झाला. जर ही ई-बेवर विकली, तर त्याचे 2.10 लाख रुपये मिळतील, असे मला वाटले; पण त्यानंतर जे सत्य समोर आले ते त्याहून अधिक धक्कादायक होते.
ही सुटकेस उघडताच आम्ही सगळे घाबरून गेलो. त्यात कुठला मृतदेह नव्हता; पण असे काही होते की, जे पाहून कोणालाही धडकी भरेल. या सुटकेसमध्ये एक जुनी भीतीदायक दिसणारी बाहुली बांधलेली होती. सुरुवातीला मला वाटले की, कदाचित ही संग्रहित करण्यासाठी ठेवली असेल; पण एक प्रश्न मला पुन्हा पुन्हा सतावत होता तो म्हणजे, ही बाहुली बांधलेली का होती? आता अंधश्रद्धेमुळे भीतीपोटी या कुटुंबावर पळून जाण्याची वेळ आली आहे!
Latest Marathi News घरात सापडली चंदेरी ब्रीफकेस, आत होते… Brought to You By : Bharat Live News Media.
