बेळगाव : लग्न मंडपात वधुपित्याच्या हातात पडली चिठ्ठी..अन् वर निघाला एचआयव्हीबाधित

बेळगाव : लग्नाच्या बोहल्यावरती राजा आणिक राणी… अर्ध्यावरती लग्न मोडले अधुरी एक कहाणी….. असाच प्रकार बेळगावात समोर आला आहे. सविताने (नाव बदलले आहे) स्वप्नातील राजकुमार पाहिला होता, अगदी तसाच वाग्दत्त वर तिने पसंत केला. गेल्या महिन्यात थाटात लग्नही पार पडणार होते. परंतु, लग्नातच कोणीतरी मुलीच्या बापाच्या हातात एक चिठ्ठी दिली अन् त्या चिठ्ठीमध्ये ठळकपणे लिहिले … The post बेळगाव : लग्न मंडपात वधुपित्याच्या हातात पडली चिठ्ठी..अन् वर निघाला एचआयव्हीबाधित appeared first on पुढारी.

बेळगाव : लग्न मंडपात वधुपित्याच्या हातात पडली चिठ्ठी..अन् वर निघाला एचआयव्हीबाधित

संजय सूर्यवंशी

बेळगाव :
लग्नाच्या बोहल्यावरती
राजा आणिक राणी…
अर्ध्यावरती लग्न मोडले
अधुरी एक कहाणी…..
असाच प्रकार बेळगावात समोर आला आहे. सविताने (नाव बदलले आहे) स्वप्नातील राजकुमार पाहिला होता, अगदी तसाच वाग्दत्त वर तिने पसंत केला. गेल्या महिन्यात थाटात लग्नही पार पडणार होते. परंतु, लग्नातच कोणीतरी मुलीच्या बापाच्या हातात एक चिठ्ठी दिली अन् त्या चिठ्ठीमध्ये ठळकपणे लिहिले होते की ‘ मुलगा एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे’. चिठ्ठीतील हे चार शब्द वाचून वधूपित्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनीही याची खातरजमा केली. तेव्हा वाग्दत्त वर खरोखरच एचआयव्हीबाधीत असल्याचे समोर आले.
 लग्नातील पुढील सोपस्कार अर्ध्यावरच थांबले. मंडपातूनच मुलीला घरी आणले. परंतु, खर्चाची रक्कम अन् नवर्‍याला घातलेले दागिने परत द्या, म्हणून या दोन कुटुंबियांत सोमवारी वाद झाला. घटनास्थळी पोलिसही गेले होते, परंतु, आम्ही हे प्रकरण आपसात मिटवून घेतो, असे दोन्ही कुटुंबियांनी सांगितल्याने याचा एफआयआर झालेला नाही.
 आजकाल लग्न जमवताना बरोबरीचे खानदान, दोन्हीकडची प्रतिष्ठा, मुला-मुलीची नोकरी, त्यांचा व्यवसाय, समाजातील स्थानमान पाहिले जाते. याच्याही पुढे जाऊन पत्रिका जुळते का यालाही महत्व दिले जाते. परंतु, २१ व्या शतकात खरोखर जे गरजेचे आहे, त्याची शहानिशा अजिबात होताना दिसत नाही. मुला-मुलीची रक्त तपासणी, त्यांचे आजार याबाबत कधी चर्चा होत नाही. पण, पुढे जाऊन त्याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात, याची कोणालाच कल्पना नाही. बेळगावातच घडलेली ही एका मोडलेल्या लग्नाची गोष्ट.
बेळगावच्या दक्षिण भागातील सविता आणि उत्तरेत राहणार्‍या अजयचे (नाव बदलले आहे) लग्न ठरले. 28 वर्षाच्या अजयचा मोठा व्यवसाय, दिसायला देखणा, बेळगावातील एका नामांकित शोरूमच्या मालकाचा तो मुलगा. मुलीचे कुटुंबही नावाजलेल्या घराण्यातील. मुलगीही चांगली शिकलेली. त्यामुळे लग्न पक्के झाले. दोघांच्या पत्रिकाही जुळवून पाहिल्या तर तेथेही बहुतांश गुण जुळले. त्यामुळे मग उशीर कशाला असे म्हणत गेल्या महिन्यातील 22 तारखेचा मुहूर्त पाहून लग्न पार पडणारच होते. पण….
अन् पायाखालची जमीन सरकली
 दोन मोठ्या कुटुंबियांचे लग्न म्हटल्यानंतर लग्नाला गर्दी झाली होती. याच गर्दीतून एक अनोळखी व्यक्ती पुढे आली अन् त्याने वधूपित्याच्या हातात एक पाकीट दिले. आधी त्यांना वाटले हा आहेर असेल. परंतु, त्या व्यक्तीने यात काहीतरी लिहिले आहे, ते वाचा असे जाताना सांगून तो अनोळखी इसम तेथून गायब झाला. त्या पाकिटातील चिठ्ठी जेव्हा वधूपित्याने बाहेर काढून वाचली तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली अन् आपल्या पायाखालची जमीनच सरकते की काय, असा भास झाला. कारण, या चिठ्ठीत लिहिले होते की जिच्याशी तुमच्या मुलीचे लग्न होत आहे, तोे मुलगा एचआयव्ही पॉझिटीव्ह आहे.
लग्नातच गोंधळ सुरू
 चिठ्ठीतील मजकूर वाचल्यानंतर वधूपित्याने याची खातरजमा करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी ही बाब आपले भाऊ, मुलासह सर्व कुटुंबियांना सांगितली. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. सर्व काही जिथल्या तिथे थांबले अन् याची खातरजमा सुरू झाली. मुलाला व त्याच्या पालकांना बोलावून घेऊन याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनीही मुलाला एचआयव्ही असल्याचे सांगितले. त्यामुळे मुलीकडच्या सर्वांचा राग अनावर झाला. मुलाकडचे सर्वजण शिकलेले असूनही औषधोपचार सुरू आहेत, तो लवकरच बरा होईल, अशी समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे वधूकडचे आणखीच भडकले. निमंत्रितांनाही नेमके काय झाले हे समजेना.
वराच्या वाहनावर हल्ला
 लग्न तेथेच थांबले. परंतु, यानंतर वधूकडच्या लोकांनी केलेला खर्च, घातलेले सोन्याचे दागिने व अन्य साहित्य परत करण्यासाठी तगादा लावला. खरेतर हे लग्न २२ डिसेंबरला झाले. त्यानंतर तेथेच सर्वकाही मिटवण्याची गरज असताना वराकडील लोकांनी याकडेही टाळाटाळ केली. त्यामुळे १ जानेवारी रोजी सायंकाळी मुलीचे कुटुंबीय व काही तरुण या मुलाच्या घरी गेले. घाबरलेल्या तरुणाने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. त्यामुळे चिडलेल्या जमावाने या तरुणाचे वाहन फोडले व घरावरही दगडफेक केली. तरुणाच्या घरावर तसेच वाहनावर दगडफेक झाल्याचे समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याचवेळी दोन्हीकडील पंचमंडळींनी व कुटुंबियांनी हे प्रकरण आम्ही आपसात मिटवून घेतो, असे सांगितल्याने याचा एफआयआर झालेला नाही.
पालकांनी बोध घेण्याची गरज
आजकाल लग्न ठरवताना पैसा, प्रतिष्ठा, मोठा व्यवसाय हे पाहताना दोन्हीकडच्या कुटुंबियांनी तरुण-तरुणीच्या आरोग्याची माहिती देखील पारदर्शीपणे देणे गरजेचे आहे. सध्या लग्नसराईचा मोसम सुरू आहे. लग्न ठरवताना पालकांनी सर्व ती माहिती घेऊनच लग्ने जमवावीत, जेणेकरून नंतर पश्चातापाची वेळ येणार नाही, असे या प्रकरणाचा तपास करणार्‍या अधिकार्‍याने सांगितले.
हेही वाचा :

मटणाच्या जेवणात नळी नसल्याने मोडले लग्न
Salman Khan Birthday : सलमाननं प्रेमात धोका मिळाल्याने नव्हे तर ‘या’ कारणाने केलं नाही लग्न
Pune News : अल्पवयीन मुलीशी लग्न करणे पडले महागात

Latest Marathi News बेळगाव : लग्न मंडपात वधुपित्याच्या हातात पडली चिठ्ठी..अन् वर निघाला एचआयव्हीबाधित Brought to You By : Bharat Live News Media.