भुजबळांचा निषेध, मराठा नेते जरांगे पाटील यांच्यासोबत
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त करीत मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी केला. जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गेल्या ६६ दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड साखळी उपोषणस्थळी सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री भुजबळ हे मराठाद्वेषी असल्याचे सांगितले.
मराठा समाजाचे नेतृत्व करणारे जरांगे-पाटील हे मंगळवारी (दि. २१) नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे येत असून, बुधवारी (दि. २२) इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे सकाळी ९ वाजता १०१ एकरांवर त्यांची जाहीर सभा होणार आहे. तसेच विश्रामगड येथे भेट व सिन्नरमधील ठाणगाव येथे सकाळी ११ वाजता सभा होत आहे. या सभा मोठ्या संख्येने यशस्वी करायच्या असून, आपले राजकीय जोडे सोडून मराठा म्हणून या सभेस येण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मंत्री भुजबळ यांचा निषेध करताना त्यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. भुजबळ हे समाजा-समाजामध्ये दुही निर्माण करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यावेळी सुनील बागूल, ॲड. नितीन ठाकरे, विजय करंजकर, करण गायकर, विलास पांगारकर, शिवाजी सहाणे, नितीन डांगे-पाटील, महंत चक्रपाणी, चंद्रकांत बनकर, नाना बच्छाव, राम खुर्दळ, नितीन रोटे-पाटील, हिरामण वाघ, शरद लभडे, संदीप गुळवे, विलास शिंदे, ॲड. लक्ष्मण लांडगे, पूजा धुमाळ, वत्सला खैरे, स्वाती खैर, रोहिणी उखाडे, एकता खैरे, ममता शिंदे आदी उपस्थित होते.
मराठा आणि ओबीसी समाजांतील संबंध चांगले असून, ओबीसी नेते समाजा-समाजामध्ये फूट पाडत आहेत. पण, मराठा समाजाने लक्ष विचलित होऊ न देता जरांगे-पाटील यांची सभा यशस्वी करायची आहे.
– नाना बच्छाव
अंबडची ओबीसी सभा मराठ्यांना टार्गेट करण्यासाठीच आयोजित केली होती. मराठा समाजाप्रति केवळ दुखावणारी विधाने सभेत केली गेली. भुजबळ संवैधानिक पदाचा गैरवापर करीत असून, त्यांच्यासह विजय वडेट्टीवार यांचा राजीनामा घ्यावा.
– करण गायकर
भुजबळ हे समाजात दुही निर्माण करीत आहेत. आता समाजातील प्रत्येकाने जरांगे-पाटील यांना सक्रिय पाठिंबा देण्याची गरज आहे. यासाठी आता सर्वांनी एकत्र यावे.
– विजय करंजकर
मराठा समाजाचे मुले-मुली वैफल्यग्रस्त झाली आहेत. त्यांना आरक्षण आवश्यक आहे. जरांगे-पाटील यांच्या लढ्यामुळे गरजवंत मराठ्यांना आधार मिळाला आहे. मराठा समाजावर गुन्हे दाखल केल्यास आम्ही वकील त्या केसेस मोफत लढू.
ॲड. नितीन ठाकरे
मनोज जरांगे-पाटील यांची सभा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. सभेच्या ठिकाणी समाजबांधवांनी वाहनतळ आणि चहा-पाण्याचे नियोजन करावे.
– शिवाजी सहाणे
मराठा नेत्यांनी छगन भुजबळ यांच्या नादी लागू नये. सरकारला ते ब्लॅकमेल करीत आहेत. तसेच त्यांनी मराठ्यांचा अंतही बघू नये. मराठा नेत्यांनी आता जरांगे-पाटील यांना पाठबळ देण्याची गरज आहे.
– विलास पांगारकर
मनोज जरांगे-पाटील हे सामान्य मराठ्यांचा आवाज आहेत. राज्य सरकारला दोनदा वेळ दिली. जिल्ह्यातील सर्व आमदार, नगरसेवकांनी त्यांचे हात बळकट करण्याचे आवाहन करतो.
– सुनील बागूल
हेही वाचा :
न्या. संदीप शिंदे समिती 28 रोजी कोल्हापूर दौर्यावर
‘बिद्री’साठी दुरंगी लढत; भाजपमध्ये दुही
फाशीची शिक्षा झालेल्या भारतीय नर्सची याचिका येमेन कोर्टाने फेटाळली
The post भुजबळांचा निषेध, मराठा नेते जरांगे पाटील यांच्यासोबत appeared first on पुढारी.
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त करीत मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी केला. जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गेल्या ६६ दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड साखळी उपोषणस्थळी सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री भुजबळ हे मराठाद्वेषी असल्याचे सांगितले. मराठा समाजाचे नेतृत्व करणारे …
The post भुजबळांचा निषेध, मराठा नेते जरांगे पाटील यांच्यासोबत appeared first on पुढारी.