नवे वर्ष… नव्या संधी!
नवीन वर्ष नवीन संधी घेऊन येत असते. अनेकजण नवीन संकल्प करतात. ते संकल्प तडीस नेण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. अनेकांना गतवर्षात अपूर्ण राहिलेली काम पूर्ण करायची असतात. गेल्या वर्षातील अपयश झटकून टाकून नवीन वर्षात काहींना नवे काही तरी करावयाचे असते. त्यामुळे नवीन वर्ष हे आल्हादायक आणि सकारात्मक मानून वाटचाल करण्याची गरज असते. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती करावयाची असते. काहींना लग्नाचे वेध लागलेले असतात. बेरोजगार नवीन वर्षात तरी नोकरी मिळेल, अशी अपेक्षा धरून असतात, तर उद्योगधंद्यांतील लोक आपली वाटचाल प्रगतीच्या मार्गाने व्हावी, अशी आशा बाळगून असतात. म्हणजे नवे वर्ष नवीन संधी म्हणून मानले जाते. संधी प्रत्येकाला मिळत असते. त्याचे सोने करण्याची जबाबदारी मात्र प्रत्येकाची असते. त्यात यश मिळो अथवा न मिळो, किमान प्रयत्नांची तरी गरज असते. आता नवीन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा बहुधा देऊन दिल्या असतील. त्यामुळे नवीन संकल्प मनाशी बाळगून प्रत्येक जण आता नक्कीच असतील. जीवनात संघर्ष हा ठरलेलाच असतो. त्याच्यावर मात करून पुढे जाण्याची प्रत्येकाची असते. त्यामुळे नवीन वर्ष हे नव्या उमेदीने भरलेले असते, तर मग सर्वांना संकल्प करूया की, या वर्षात काहीतरी नवीन करायचे!
मित्रहो, नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा! दमा आणि सांधेदुखीचा त्रास असणार्यांना नवीन वर्षात आल्हाददायक हवामानासाठी शुभेच्छा! वारकरी मंडळीना भक्ती मार्गासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शुभेच्छा! बालकांना दप्तराचे वजन कमी होण्यासाठी शुभेच्छा आणि पालकांना बालकांचे ओझे कमी होण्यासाठी शुभेच्छा! विद्यार्थ्यांना सहनशीलतेने शिकविणार्या शिक्षकांना भरघोस पगारवाढीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा! प्राध्यापकांना वाढीव पगारासाठी, वाढीव आरामासाठी आणि वाढीव शारीरिक आकारमानासाठी शुभेच्छा! प्राचार्यांना प्राध्यापकांकडून आणि उनाड विद्यार्थ्यांपासून सुटका होण्यासाठी शुभेच्छा! प्रत्येक विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात विनासायास जाण्यासाठी शुभेच्छा! नगरपालिका/मनपा कर्मचारी यांना नियमित पगारासाठी शुभेच्छा आणि नागरिकांना शहर सुंदर होण्यासाठी शुभेच्छा!
विवाहास उत्सुक तरुण-तरुणींना विवाह जुळण्यासाठी शुभेच्छा आणि नवविवाहितांना मने जुळण्यासाठी शुभेच्छा! जुन्या जोडप्यांना संसार टिकण्यासाठी शुभेच्छा! केमिस्ट मंडळींना दुकाने वर्षभर मुक्त वातावरणात राहावीत, यासाठी शुभेच्छा!
एकाच वेळी डॉक्टरांना आणि रुग्णांना शुभेच्छा कशा देता येतील बरे? कारण, एकाला वर्ष चांगले जाईल, तर तेच वर्ष दुसर्याला मात्र वाईट जाईल. म्हणजे रुग्णांचे दुखलेच नाही, तर त्यांना वर्ष चांगले जाईल; पण रुग्णालय डॉक्टरांसाठी वर्ष वाईट जाईल. त्यामुळे रुग्णांना ‘बरे’ होण्यासाठी शुभेच्छा आणि त्यांच्या डॉक्टरांना गतवर्षीपेक्षा आणखी ‘बरे’ दिवस येण्यासाठी शुभेच्छा! वकिलांना खरे बोलण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिपक्षाच्या वकिलांना खोट्याचे खरे करण्यासाठी शुभेच्छा! फारसा उपयोग होणार नाही; पण पक्षकारांना वकिलांची संगत लवकर सुटण्यासाठी शुभेच्छा!
Latest Marathi News नवे वर्ष… नव्या संधी! Brought to You By : Bharat Live News Media.