प्रवरा भूमिपुत्राच्या खांद्यावर राज्याच्या प्रशासनाची धुरा

लोणी : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोणीचे भूमिपुत्र आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी डॉ. नितीन करीर यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून निवड झाल्यानंतर ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. राज्याच्या प्रशासनाची धुरा प्रवरेच्या भूमिपुत्राच्या खांद्यावर आली हा प्रवरेचा मोठा सन्मान आणि आमच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे, अशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले.
राज्याचे 47 वे मुख्य सचिव म्हणून डॉ. नितीन करीर यांची निवड झाल्याचा संदेश गावात पोहोचल्यानंतर लोणी बुद्रुकच्या ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. डॉ. नितीन करीर हे मूळचे लोणी बुद्रुक गावचे रहिवासी असून, त्यांचे शिक्षणही प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये झाले. 1988च्या बॅचचे आयएएस अधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेत आपले कार्य सुरू केले. प्रशासनामध्ये विविध मोठ्या पदांवर काम करतानाही त्यांनी लोणीची नाळ तुटू दिली नाही. या गावाशी त्यांचा ऋणानुबंध कायम राहिला.
लोणीमध्ये मागील वर्षी झालेल्या महसूल परिषदेच्या आयोजनात त्यांचा पुढाकार होता. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांची उपस्थिती ही ग्रामस्थांसाठी सदैव प्रेरणादायीच ठरली. आता राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रवरेच्या भूमिपुत्राचा मोठा सन्मान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरध्वनीवरून डॉ. नितीन करीर यांचे अभिनंदन करून, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या एका माजी विद्यार्थ्याचा हा मोठा सन्मान आहे. याचा निश्चितच प्रवरा परिवाराला अभिमान असून, त्यांच्याकडे असलेला प्रशासकीय अनुभव निश्चितच राज्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Latest Marathi News प्रवरा भूमिपुत्राच्या खांद्यावर राज्याच्या प्रशासनाची धुरा Brought to You By : Bharat Live News Media.
