पोलिसांच्या त्रासामुळे तरूण बेपत्ता

शेवगाव तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा : शेवगाव पोलिसांनी तरूणाला विनाकारण बेदम मारहाण केल्याने, हा अन्यायग्रस्त तरूण गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. याबाबत त्याच्या पत्नीने संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करावी व अधिकार्याच्या त्रासाला कंटाळून बेपत्ता झालेल्या पतीस शोधून द्यावे, अशी मागणी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे केली आहे. या घटनेने पोलिसांची चांगलीच पाचर धारावर बसली असून, ते या तरूणांचा शोध घेत आहेत. शेवगाव शहरातील दीपक गावडे या तरूणाला आर्थिक तक्रार असल्याच्या बहाण्याने शनिवारी (दि.30) शेवगाव पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. त्या वेळी त्याच्या विरोधात कुठलीही तक्रार दाखल झालेली नसताना, पोलिस निरीक्षकासह काही पोलिसांनी एका महिला पोलिसाच्या सांगण्यावरून त्याला सकाळी 11 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत ठाण्यात बेदम मारहाण केली. शहरातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींचे फोन आल्याने गावडे यास सोडून देण्यात आले.
मात्र, विनाकारण मारहाण झाल्याने हताश झालेले गावडे आपल्यावर पोलिसांनी अन्याय केला असे म्हणून ठाण्याच्या बाहेर ओक्साबोक्सी रडत होते. आता मी आत्महत्या करणार, अशी निराशा व्यक्त करीत गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. गावडे बेपत्ता झाल्याने पोलिसांसह त्यांचे कुटुंबिय व इतरांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले. घटना होऊन दोन दिवस उलटले तरीही ते न सापडल्याने त्यांच्या पत्नी जनाबाई गावडे यांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. माझ्या पतीला पोलिस अधिकारी व काही पोलिसांनी तक्रार नसताना एका महिला पोलिसाच्या सांगण्यावरून विनाकारण मारहाण केली. त्यांनी मला व माझे दीर सागर गावडे यांना फोनवर घडलेल्या घटनेची माहिती दिली.
तसेच, हा माझा शेवटचा फोन अअसून, मी आत्महत्या करणार असल्याचे सांगून फोन बंद केला. माझ्या पतीला पोलिस अधिकारी व पोलिसांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून त्यांनी जीवाचे काही बरेवाईट केल्यास, यास ते जबाबदार राहतील. तसेच, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व माझ्या पतीचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांच्या पत्नीने उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे. यामुळे मारहाण करणार्या पोलिस अधिकार्यासह पोलिसांची पाचर धारावर बसली असून, ते त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
वंचित आघाडी रस्त्यावर उतरणार
शेवगावचे पोलिस कायद्याचा दुरूपयोग करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून असे प्रकार घडत आहेत. कायद्याचा धाक दाखवून पैसे उकळले जात आहेत. शहरात चढ्या व्याजाने पैसे देणारे बेकायदेशीर सावकार आहेत. या सावकारांचे व पोलिसांचे संधान आहे. गावडे यास न्याय न मिळाल्यास वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांनी दिला आहे.
Latest Marathi News पोलिसांच्या त्रासामुळे तरूण बेपत्ता Brought to You By : Bharat Live News Media.
