भोलावड्यात 30 गुंठ्यांत कारल्याची शेती

भोर : Bharat Live News Media वृत्तसेवा : भोलावडे (ता. भोर) येथील प्रगतशील शेतकरी सूर्यकांत बाबुराव काळे यांनी एसआरटी या अत्याधुनिक पद्धतीने 30 गुंठ्यांमध्ये कारल्याची यशस्वी शेती केली आहे. सध्या बाजारात कारल्याला प्रतिकिलो 40 रुपयांचा दर मिळत असून, काळे यांना त्यांच्या कारल्याच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे. काळे यांनी कामथडी (ता. भोर) येथील चैतन्य हायटेक नर्सरीमधून कारल्याच्या मिडोरीलाँग या वाणाची 3 हजार 800 रोपे आणली. रोपांची लागण करण्यापूर्वी गांडूळ खतांचा 25 गोणीचा बेसल डोस दिला. तयार गादी वाफ्यावर दोन ओळीत 5 फूट व दोन वेलीत 2 फूट अंतर ठेवून ऑक्टोबरच्या दुसर्या आणि चौथ्या आठवड्यात दोन टप्प्यांत लागवड केली.
दररोज 2 तास ठिबक सिंचनने पाणी दिले. गोकृपा अमृतचा 500 लिटरचा डोस दिला. रोप लावल्यानंतर दर 4 दिवसांनी गोकृपा अमृत, देशी गाईचे गोमुत्राची फवारणी केली. 8 दिवसांनी दशपर्णी अर्काची फवारणी केल्याने कीड नियंत्रणात आली. दर 4 दिवसांनी ठिबकद्वारे दोन किलोप्रमाणे संपूर्णा, मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट, बोरान, इसाबेन दिले जात आहे. तार-काठीने दोन आठवड्यानंतर कारल्याचे वेल बांधण्यास सुरुवात केली. वेल वाढीला लागल्यावर दररोज वेल बांधणे सुरू केले. 45 दिवसांनंतर चार दिवसांत एकदा कारल्याचा तोडा सुरू करण्यात आला. त्यानंतर सासवड व शेवाळवाडी येथील बाजारामध्ये त्यांनी घाऊक विक्री सुरू केली आहे.
कारल्याचे उत्पादन उच्च प्रतीचे असल्यामुळे त्यांना सरासरी प्रतिकिलो 40 रुपयांचा दर मिळत आहे. आतापर्यंत 12 तोडे झाले असून, दर तोड्यास सरासरी 120 किलो फळे मिळत आहेत. तर जानेवारी अखेरपर्यंत आणखी 7 तोडे होण्याची अपेक्षा आहे.
सूर्यकांत काळे, प्रगतशील शेतकरी, भोलावडे, ता. भोर.
Latest Marathi News भोलावड्यात 30 गुंठ्यांत कारल्याची शेती Brought to You By : Bharat Live News Media.
