पक्ष मजबुतीसाठी जनतेच्या प्रश्नांना भिडा : हसन मुश्रीफ
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी गोरगरीब जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीकरिता परिश्रम घ्यावेत तसेच त्यांच्या प्रश्नांना थेट भिडावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले. मार्केट यार्डमध्ये सोमवारी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील होते.
या बैठकीत तालुकानिहाय निधी वाटप, विविध शासकीय व अशासकीय समित्यांचे पदवाटप, विशेष कार्यकारी अधिकारी पदांचे वाटप व पक्ष संघटनेतील रिक्त पदांवर पदाधिकार्यांच्या नेमणुकांबाबत चर्चा झाली. तसेच पक्षामध्ये पदाधिकारी नेमण्यासाठी तसेच विविध समित्यांसाठी नावे देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, शेंडा पार्कमध्ये उभारण्यात येणार्या अकराशे बेडच्या हॉस्पिटलचे भूमिपूजन गृहमंत्री अमित शह यांच्या हस्ते होणार आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विस्तारीत इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि सहकार परिषद होईल. त्याच दिवशी रात्री दोन लाख लोकांच्या उपस्थितीत लोकसभा प्रचार शुभारंभाची सभाही होणार आहे.
यावेळी आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक भय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, सुधीर देसाई, धैर्यशील पाटील- कौलवकर, विठ्ठल चोपडे, जिल्हा युवक काँग्रेसचे नूतन अध्यक्ष नितीन दिंडे यांची भाषणे झाली. शहराध्यक्ष आदिल फरास यांनी स्वागत, तर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. आभार कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी मानले.
‘बिद्री’च्या निवडणुकीनंतर मुश्रीफ-ए. वाय. यांची भेट
पालकमंत्री हसन मुश्रीफ व ए. वाय. पाटील यांच्यात बिद्री साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून बराच दुरावा निर्माण झाला होता. या बैठकीच्या निमित्ताने हे दोघे एकत्र आले. मंत्री मुश्रीफ यांनी गाडीतून उतरताच काय ए. वाय? अशी हाक मारली, यावर ए. वाय. पाटील यांनी नमस्कार करत गालातल्या गालात स्मित हास्य केले.
Latest Marathi News पक्ष मजबुतीसाठी जनतेच्या प्रश्नांना भिडा : हसन मुश्रीफ Brought to You By : Bharat Live News Media.