दुष्काळावर मात.. शेतकर्यांना सिंचनाची साथ..!
राहुरी : Bharat Live News Media वृत्तेसवा : मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडीला पाणी सोडल्याने येथील शेतकर्यांना उन्हाळी आवर्तनाचा फटका सहन करावा लागणार आहे. आगामी दुष्काळावर मात करण्यासाठी राहुरी तालुका कृषी विभागाने सिंचन योजनांवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला. शासनाने तुषार व ठिबक सिंचनासाठी 80 टक्के अनुदान योजनेसह शेत तळे खोदाई, अस्तारिकरण, प्लास्टीक मल्चिंग, शेडनेट, पॉलि हाऊस, सुक्ष्म सिंचनाचे ऑटोमायझेशन या योजनांचा जास्तीत- जास्त शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकारी बापुसाहेब शिंदे यांनी केले आहे.
राहुरी परिसरामध्ये रब्बी हंगामाला प्रारंभी अवकाळीने खोडा घातला. अवकाळीनंतर ढगाळ हवामानाने त्रस्त केले. गुलाबी थंडीची चाहूल सुरू होताच शेतकर्यांनी रब्बी पिकांना पसंती देण्यास प्रारंभ केला. राहुरी तालुका पूर्वीपासून ऊस क्षेत्राचा आगार मानला जातो, परंतू पावसाच्या अनपेक्षित अवकृपेने शेतकर्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले. जिल्ह्यातील धरणांवर यंदा ‘समन्यायी’ची तलवार कोसळल्याने दुष्काळाची दाहकता वाढली. परिणामी शेतकर्यांनी रब्बी पेरण्यांबाबत सावध पावित्रा घेतल्याचे दिसले. नववर्ष उजाडताना रब्बी पिकांची आकडेवारी अवघी 65 टक्केपर्यंत आहे. कपाशीला दराचा फटका बसल्यानंतर उशिरापर्यंत काढणी सुरू आहे. कापूस वेचणी होऊन जानेवारीत रब्बी पेरण्यांना अधिक वेग येईल, अशी अपेक्षा कृषीने व्यक्त केली आहे.
राहुरी तालुक्यात लागवडीस 71 हजार हेक्टर क्षेत्र आहे. 15, 439 हेक्टरवर कृषीला रब्बी पेरणी अपेक्षित होती. यापैकी 9, 810 हेक्टरवर पीक पेरा पूर्ण झाल्याची नोंद आहे. ज्वारी 3,258 हेक्टरवर अपेक्षित असताना 2 हजार हेक्टरवर पेरणी झाली. गहू पीक पेरणी 8,118 हेक्टर अपेक्षित असताना 5, 102 हेक्टरवर झाली. मका पेरणी 730 हेक्टरवर अपेक्षित असताना 743 हेक्टरवर पेरा झाला. हरभरा 3, 337 हेक्टर क्षेत्र अपेक्षित असताना 1,956 हेक्टरवर पेरा झाला.
यासह रब्बी हंगामात शेतकर्यांनी कमी कालावधीत उत्पन्न देणार्या कांद्याला अधिक पसंती दिल्याचे दिसते. 3,790 हेक्टर क्षेत्रावर पसंती दिली. आगामी दुष्काळजन्य परिस्थिती पाहता जनावरांसाठी चारा पिकांना 3,279 हेक्टरवर पसंती मिळाली. भाजीपाला 74 हेक्टरवर पसंती आहे. रब्बीमध्ये शेतकर्यांची, ‘कही खुशी, कही गम,’ अशी अवस्था झाली आहे. पिकांना दर मिळत नसल्याने शेतकरी चिंताक्रांत आहे. आगामी दुष्काळाला सामोरे जाताना शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार, हे तेवढेच खरे!
दरम्यान, आगामी दुष्काळाची चाहूल पाहता कमी पाण्याचा वापर व्हावा, यासाठी शेतकर्यांनी तुषार व ठिबक सिंचनाला पसंती द्यावी, असे आवाहन कृषीने केले आहे. सिंचनास शासनाचे 80टक्के अनुदान आहे. तुषार किंवा ठिबक सिंचनामुळे पाण्याचा 50 टक्के वापर कमी होतो. रब्बीमध्ये ज्वारीला चिकटा, माव्याचा प्रादुर्भाव, कांद्याला करपा, फुलकीडे तर हरभरा-घाटी अळी, गव्हाला मावा, तांबेरा रोगाचा प्रादुर्भावाचा धोका अधिक आहे. शेतकर्यांनी यावर उपाय- योजना करताना अधिक रासायनिक खतांचा वापर करू नये. कृषी व म. फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने कीटक नाशक किंवा बुरशी नाशकांचा वापर करावा, असे आवाहन कृषीने केले आहे.
शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर तुषार व ठिबक सिंचनासह प्लास्टीक मल्चिंगचा वापर, शेततळे खोदाई, अस्तारिकरण योजना, संरक्षित शेती क्षेत्रामध्ये पॉली हाऊस, शेडनेट आदी योजनांचा लाभ शेतकर्यांना दिला जातो. महाबीडीबीटी ऑनलाईन पोर्टलचा वापर करुन, योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकारी शिंदे यांनी केले आहे.
फळबागा शेतकर्यांना झाडे जगविण्यासाठी मल्चिंग पद्धतीसह ठिबक व तुषार सिंचनाचा वापर लाभदायी ठरणार असल्याचे सांगण्यात आले. रब्बी 65 टक्के पेरणी झाल्याने जानेवारीत पेरणीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याबाबत कृषीच्या माहितीनुसार उशिरा पेरा केल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जानेवारीनंतर उष्णता वाढल्याने पिकांचे नुकसान होते. शेतकर्यांनी यावर काळजी घ्यावी, असे आवाहन कृषीनेकेले आहे.
पाणी टंचाई असताना शेतकरी रासायनिक खत वापरावर भर देतात. तसे न करता नॅनो युरिया, नॅनो डीएपीचा विद्रव्य खतांचा वापर करावा. डाळींबाच्या पीक विम्याचा लाभ घ्यावा.
– बापुसाहेब शिंदे, राहुरी ता. कृषी अधिकारी
Latest Marathi News दुष्काळावर मात.. शेतकर्यांना सिंचनाची साथ..! Brought to You By : Bharat Live News Media.