पोलिस असल्याचे सांगून माजी सैनिकाला फसवले
दौंड : Bharat Live News Media वृत्तसेवा : क्राईम ब्रांच अधिकारी असल्याची बतावणी करून दोन तरुणांनी माजी सैनिकाकडील 2 लाख 75 हजार रुपयांची सोनसाखळी व अंगठी हातचलाखीने लंपास केली. हा प्रकार रविवारी (दि. 31) दौंड शहरातील शालिमार चौकात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला. भरदिवसा व वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी के. जे. चंद्रन (वय 70, रा. जनता कॉलनी, दौंड) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, के. जे. चंद्रन हे दुपारी दोनच्या सुमारास दौंड येथील शालिमार चौकात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते. तेथे 40 ते 45 वर्षीय तरुण त्यांना भेटला. त्याने चंद्रन यांना ’मी क्राईम ब्रांचचा अधिकारी आहे. तुम्ही रेल्वेत नोकरीला होता ना?’ असा सवाल केला.
त्यावर चंद्रन यांनी होकार दिला. त्यानंतर त्या तरुणाने ’तुम्ही मनोज शर्मा यांना ओळखता का? असे विचारुन बोलण्यात गुंतवले. त्यानंतर त्याने दुसर्या साथीदाराला बोलाविले. दोघांनीही ’तुम्ही येथून हलू नका. गोंधळ करू नका. तुमचे पॉकेट दाखव. हातात अंगठी का घातली आहे. ती काढून तुझ्या रुमालात ठेवा आणि तो रुमाल खिशातच ठेवा,’ असे सांगितले. मात्र, चंद्रन यांच्याकडे रुमाल नव्हता. त्यामुळे एकाने त्याचा रुमाल त्यांना दिला व दोन्ही सोन्याच्या अंगठ्या व सोनसाखळी काढून रुमालात ठेवण्यास सांगितले. त्यामुळे चंद्रन यांनी अंगठ्या व सोनसाखळी रूमालात ठेवून खिशात टाकल्या. या वेळी दोघेही तेथून निघून गेले. चंद्रन यांनी खिशातील रुमाल उघडून पाहिला असता, त्यात ठेवलेले 2 लाख 75 हजार रुपये किमतीचे दागिने नसल्याचे दिसले. त्यामुळे दोघांनी हातचलाखी करून आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
Latest Marathi News पोलिस असल्याचे सांगून माजी सैनिकाला फसवले Brought to You By : Bharat Live News Media.