नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मटारने खाल्ला भाव ; फ्लॉवर, कोबी महाग

शंकर कवडे
पुणे : राज्यासह परराज्यातून दाखल झालेल्या हिरव्यागार टपोर्या मटारला रविवारी (दि. 31) बाजारात मोठी मागणी राहिली. नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर हॉटेलसह घरोघरी मटारचे कटलेट, भाजी अन् उसळीचे नियोजन झाल्याने त्याच्या खरेदीसाठी हॉटेल व्यावसायिकांसह घरगुती ग्राहकांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी राहिल्याने घाऊक बाजारात किलोचे भाव 28 ते 36 रुपयांवर पोहचले, तर किरकोळ बाजारात 60 ते 80 रुपये किलो दराने मटारची विक्री सुरू होती.
गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. थंडीमुळे उत्पादनात घट होऊन उत्पादन रोडावल्याने फ्लॉवर व कोबीची आवक घटली होती. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत आवक कमी राहिल्याने त्यांच्या भावातही गत आठवड्याच्या तुलनेत दहा टक्क्यांनी वाढ झाली होती. उर्वरित अन्य सर्व फळभाज्यांचे भाव टिकून असल्याची माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून हिरवी मिरची सुमारे 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून 4 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 14 ते 15 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा 4 ते 5 टेम्पो, भुईमुग शेंग कर्नाटक येथून 2 टेम्पो, मध्य प्रदेश 25 ट्रक मटार, कर्नाटक येथून 2 ते 3 टेम्पो पावटा, मध्यप्रदेश येथून लसूण सुमारे 5 टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 600 ते 700 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो सुमारे 10 ते 12 हजार क्रेट, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 8 ते 10 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, पावटा 4 ते 5 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा जूना आणि नवीन सुमारे 100 ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 70 टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
शेपू, चुका, हरभरा गड्डी महागली
पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात शेपू, चुका, हरभरा गड्डीच्या भावात गड्डीमागे एक ते दोन रुपयांनी वाढ झाली. आवक जावक कायम असल्याने अन्य पालेभाज्यांचे गत आठवड्यातील दर टिकून होते. रविवारी (दि. 31) कोथिंबिरीची तब्बल दीड लाख जुडी तर मेथीची 70 हजार जुडी इतकी आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरीची आवक 50 हजार तर मेथीची आवक 20 हजार जुड्यांनी वाढली. घाऊक बाजारात एका जुडीची 3 ते 16 रुपये तर किरकोळ बाजारात 10 ते 30 रुपये दराने गड्डीची विक्री सुरू होती.
हेही वाचा :
Nashik Onion News : नाफेड, एनसीसीएफ कांदा खरेदीत झोल; चौकशीसाठी शेतकऱ्याचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र
Nashik Drought News : नाशिक जिल्ह्यात १,०८८ गावांमध्ये दुष्काळ
Latest Marathi News नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मटारने खाल्ला भाव ; फ्लॉवर, कोबी महाग Brought to You By : Bharat Live News Media.
