जैविक वय कमी करण्याचा फॉर्म्युला
मेक्सिको : आपले वय कमी वाटावे, असे जवळपास प्रत्येकाला वाटत असते. काही जण यासाठी नियमित व्यायामावर भर देतात, तर काही जण अगदी डॉक्टरी उपचार घेतात, ठराविक अंतराने चाचणी करून घेत राहतात. काही जण फलाहारावर भर देतात, तर काही जण वक्तशीरपणालाही पसंती देतात. वय कमी दिसावे, यासाठी प्लास्टिक सर्जरीचा महागडा उपाय अवलंबणारे देखील काही महाभागही आढळून येतात. मात्र, संशोधकांनी आता असा फॉर्म्युला शोधून काढला आहे की, ज्यामुळे जैविक वय अगदी अडीच वर्षांपर्यंत कमी केले जाऊ शकते.
आता वाढते वय कोणालाच थोपवता येत नाही, ही वस्तुस्थिती कोणालाही मान्य करावी लागेल; पण किमान जैविक वय तरी कमी असावे, या अनुषंगाने एका अभ्यासात भर देण्यात आला आणि त्यात पुरेपूर यश आल्याचा संशोधकांचा दावा आहे. संशोधकांच्या या नव्या अभ्यासानुसार, हिरवळीने नटलेल्या निसर्गसुंदर ठिकाणी राहिल्यास याचा आपल्यावर जैविक सकारात्मक परिणाम होतो आणि आपण किमान अडीच वर्षांनी तरुण दिसू लागतो.
या संशोधकांच्या पथकाने केलेल्या या अभ्यासात असे आढळून आले आहे की, अशा हिरवळीच्या जागा शारीरिक हालचाल वाढवण्यासाठी प्रेरणा देतात, त्यामुळे सामाजिक संपर्क वाढतो आणि अगदी गुन्ह्याशी संबंधित घटनाही कमी होतात. ‘सायन्स ऑफ द टोटल एन्व्हायर्न्मेंट जर्नल’मध्ये याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे.
संशोधकांनी यावेळी साधारणपणे 8 हजार नागरिकांचा याबाबत अभ्यास केला आणि पार्क, उद्याने, बागा, झाडेझुडपे व हिरवळ असलेल्या परिसरात राहणार्या व्यक्ती अधिक सकारात्मक असतात. शिवाय, शारीरिक व मानसिक ताणतणाव त्यांच्यात कमी असतो, असे यात आढळून आले. झाडे प्रचंड उन्हात सावली देतात, वायू प्रदूषण कमी करतात. याचबरोबर अशा ठिकाणी आपली शारीरिक हालचाल अधिक होते. या सर्व बाबींचा आपल्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो, असे या अभ्यास गटाने नमूद केले आहे.
Latest Marathi News जैविक वय कमी करण्याचा फॉर्म्युला Brought to You By : Bharat Live News Media.