छत्रपती संभाजीनगर/वाळूज महानगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : वाळूज एमआयडीसीतील सनशाईन कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीत सहा कामगारांचा जीव गेला. या घटनेला कंपनी मालक आणि ठेकेदारच जबाबदार असल्याचे वेगवेगळ्या विभागांच्या पथकांनी केलेल्या पाहणीत समोर आले आहे. कंपनी मालकाच्या दहा चुकांमुळेच ही आग लागली आणि त्यात सहा कामगारांचा बळी गेल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी रविवारी (दि. ३१) त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि दोघांनाही अटक केली. (Waluj MIDC Fire )
कंपनी मालक साबेरखान शब्बीरखान पठाण (रा. गल्ली क्र. १०, न्यू बायजीपुरा) आणि ठेकेदार मोहंमद हसीनोद्दीन शेख (रा. डलौखर, ता. मिर्झापूर, जि. मधुबनी, बिहार) अशी आरोपींची नावे आहेत. अग्निशामक दलाचे अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, कामगार विभाग, महावितरणचे विद्युत निरीक्षक यांच्यासह कंपनी मालक आणि ठेकेदाराने पाहणी केल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी रिपोर्ट पोलिसांना सादर केले आहेत. (Waluj MIDC Fire )
कंपनी मालक अन् ठेकेदाराच्या या आहेत दहा चुका
१) औद्योगिक भूखंड असताना कंपनी मालक आणि ठेकेदाराने तेथे १३ कामगार व त्यांच्या परिवारासह १७ जणांच्या वास्तव्याची तेथेच सोय केल्याने ते आगीत अडकले.
२) कंपनीतील उत्पादन हे ज्वलनशील असल्याची माहिती असताना अनाधिकृत बांधकाम करून कामगारांसह त्यांच्या परिवाराची तेथेच राहण्याची सोय करून ज्वलनशील गॅस, इलेक्ट्रिक शेगडी, हीटर अशी उपकणे उपलब्ध करून दिली.
३) अनाधिकृत बांधकाम करून दूर्घटना घडल्यास सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी असणारे वेगवेगळे काम बंद केले. तसेच नियमाप्रमाणे चारही बाजुने मोकळी जागा सोडणे बंधनकारक असताना मोकळी जागा दिसून आली नाही.
४) कंपनीत अनाधिकृत राहण्याची सोय केलेली होती. तेथे जाण्या-येण्यासाठी अपुरी जागा होती. कमकुवत शिडीवरून कामगार व त्यांचे कुटूंब ये-जा करीत होते.
५) कंपनीत कोठेही फायर सेफ्टी व अग्निरोधक यंत्र, अशी काळजी घेतल्याचे दिसून आले नाही.
६) कंपनीचे कधीही फायर आॅडिट, स्ट्रक्चरल आॅडिट केलेले नाही.
७) एमआयडीसीकडून कोणतीही परवानगी न घेता अतिरिक्त बांधकाम केले. त्यामुळे कामगारांच्या जीवितास धोका निर्माण झाला.
८) कंपनी मालकाने इलेक्ट्रिकल सेफ्टी आॅडिटही केलेले नाही. तेथे वापरलेली इलेक्ट्रिक उपकरणे व वायरही अत्यंत साधारण दर्जाची होती, असे इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर यांच्या पाहणी आढळले.
९) कंपनी मालकाच्या या संपूर्ण चुकांमध्ये ठेकेदाराने साथ दिल्याचे कामगारांच्या बोलण्यावरून स्पष्ट होते.
१०) ठेकेदाराने काेणतीही काळजी न घेता अपुऱ्या जागेत १७ जणांना ठेवले.
हेही वाचा :
Waluj MIDC Fire : जॅकेट आणि हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; ६ कामगारांचा होरपळून मृत्यू
Dhule News: धुळे सत्र न्यायालयाकडून २०२३ मध्ये ३३ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
हिंगोली: पिकअपचा टायर फुटून अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
Latest Marathi News वाळूज एमआयडीसीतील कंपनीत मालक, ठेकेदाराच्या ‘या’ दहा चुकांमुळेच सहा कामगारांचा बळी Brought to You By : Bharat Live News Media.