बघता बघता राष्ट्रवादीच्या स्नेहमेळाव्याची झाली आमसभा
वडगाव मावळ : आंदर मावळ भागातील नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या सूचनेनुसार पदाधिकारी व नागरिकांनी मांडलेले प्रश्न व त्यावर आमदारांनी दिलेली उत्तरे यामुळे या स्नेहमेळाव्याचे रूपांतर आमसभेत झाले. अनेकांनी आपल्या समस्या व प्रश्नांना वाचा फोडली.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून फळणे फाटा येथे राष्ट्रवादीचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश ढोरे, विठ्ठलराव शिंदे, महिलाध्यक्षा दीपाली दराडे, ग्रामीण अध्यक्ष संदीप आंद्रे, युवकाध्यक्ष किशोर सातकर, रोहिदास महाराज धनवे, मंजुश्री वाघ, सुवर्णा राऊत, शोभा कदम, कल्याणी काजळे, साहेबराव कारके, नामदेव दाभाडे, गणेश काकडे, पंढरीनाथ ढोरे, नारायण ठाकर, नामदेव शेलार, अंकुश आंबेकर, शिवाजी असवले आदी उपस्थित होते.
1 बूथ, 25 यूथ मोहीम राबवावी
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, की राज्यात अजित पवार व तालुक्यात आमदार शेळके यांच्यासारखे नेतृत्व लाभल्याने आंदर मावळचे सुंदर मावळ व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी या संधीचा फायदा घेणेही आवश्यक आहे. पदाधिकार्यांनी मी मोठा की तू मोठा, यापेक्षा तालुका कसा मोठा होईल, याचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 बूथ, 25 यूथ ही मोहीम राबवावी व जिल्हा पदाधिकार्यांवर त्याची जबाबदारी द्यावी, असे आवाहन केले.
महिनाभरात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
आमदार शेळके यांनी मेळावा सुरू होण्यापूर्वीच आंदर मावळ भागातील प्रतिनिधी व नागरिकांनी काही समस्या प्रश्न असल्यास त्याबाबत सूचना करावी, असे आवाहन केले. त्यानुसार आंदर मावळ भागातील अनेक ग्रामपंचायतचे प्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी पदाधिकारी, नागरिक व महिलांनी प्रामुख्याने वीजपुरवठा, कचरा व्यवस्थापन, एसटी बसची व्यवस्था, शाळेची दुरवस्था, स्मशानभूमी शेड, आदिवासी वस्तीवरील समस्या असे अनेक प्रश्न मांडले. दरम्यान, आमदार शेळके यांनी संबंधित प्रश्नांवर तात्काळ अपेक्षित उत्तरे दिली व महिनाभरात संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे या मेळाव्याला आमसभेचे स्वरूप आल्याचे दिसून आले.
घुसमट होणार्यांसाठी नवी स्कीम काढू
उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाच्या माध्यमातून तालुक्यात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू असून पक्षातही चांगले वातावरण असताना काही लोकांची घुसमट होऊ लागल्याने ते गटातटाचे राजकारण करू लागले आहेत. अशा लोकांसाठी जानेवारी महिन्यात त्यांनी सत्कार घ्यावा व आपला मार्ग पत्करावा, अशी स्कीमच काढू अशी टिपण्णी करत काही चुकत असेल तर माझे कान धरा, स्पष्ट बोला पण ज्यांनी तालुक्याला भरभरून दिले त्या दादांसाठी एकजूट ठेवा, असे आवाहन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे फक्त आंदर मावळ भागासाठी 624 कोटींचा निधी आला आहे. अजूनही काही प्रश्न असतील किंवा न्याय देण्यात कमी पडत असेल तर थेट सांगा, असे आवाहन केले. काहीजण पाठीमागे चुकीची चर्चा करतात, त्यांनी अशी चर्चा न करता खुले पणाने विचारावे, मी ही खुले पणाने उत्तर देईन असेही स्पष्ट केले. तालुकाध्यक्ष खांडगे यांनी तालुक्यात पक्षसंघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा आढावा मांडला व पदाधिकार्यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले. तसेच, जानेवारी महिन्यात तालुक्यातील बूथ कमिट्या तयार करण्यात येणार आहेत.
– सुनील शेळके, आमदार
हेही वाचा
thirty first december : महाराष्ट्रात ४६% लोकांचा थर्टी फर्स्ट घरीच!
रत्नागिरी : गोळप घरफोडी प्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक
Pune : ठेकेदाराकडे लाच मागणारा पालिकेचा शिपाई जाळ्यात
Latest Marathi News बघता बघता राष्ट्रवादीच्या स्नेहमेळाव्याची झाली आमसभा Brought to You By : Bharat Live News Media.