111 जागांवर पूर्णवेळ प्राध्यापक; विद्यापीठाकडून जाहिरात प्रसिद्ध
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या रिक्त असणार्या जागांपैकी 111 जागांवर पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती होणार असून, त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दि.1 जानेवारीपासून ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहे. प्राध्यापक भरतीची जाहिरात शनिवारी प्रकाशित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यांत विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांना पूर्णवेळ प्राध्यापक मिळणार आहेत.
काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पुणे विद्यापीठाला 215 पैकी 111 रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार ही पदे भरण्यासाठी आवश्यक असणारी जाहिरात विद्यापीठाकडून प्रकाशित करण्यात आली आहे. त्याची माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवरही मिळेल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या प्रशासनामध्येही काही पदे भरण्यात येणार आहेत. त्याबाबतची कार्यवाही करण्यात आली असून, लवकरच जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील, असे प्रशासनाच्या अधिकार्यांनी सांगितले.
विद्यापीठात साधारण 12 वर्षांपासून प्राध्यापक भरती न झाल्याने, विविध शैक्षणिक विभागांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. काही विभागांमध्ये तर, केवळ एक किंवा दोन पूर्णवेळ प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यापीठात पूर्णवेळ अध्यापन करणार्या प्राध्यापकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी राहिली आहे. या सर्वांचा परिणाम विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असून, विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्राध्यापक उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने काही दिवसांपूर्वी कंत्राटी तत्त्वावर 133 प्राध्यापकांची भरती प्रक्रिया राबवली आहे. इच्छुक उमेदवारांना
31 जानेवारीपर्यत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता वाढणार
विद्यापीठात प्राध्यापकांच्या 111 जागा भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, हे प्राध्यापक साधारण पुढील 25 वर्षे विद्यापीठात कार्यरत राहणार आहेत. विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने या नव्या प्राध्यापकांवर राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया नियमांच्या अधीन राहून शैक्षणिक गुणवत्तेवर आणि पारदर्शी पद्धतीने राबविण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा
नाट्य संमेलनाच्या ‘नेपथ्य’ची जबाबदारी श्याम भूतकर यांच्यावर
विद्यार्थ्याने बनवला जनावरांना शेतापासून दूर ठेवणारा अलार्म
Pune News : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील उद्यापासून वाहतुकीत बदल
Latest Marathi News 111 जागांवर पूर्णवेळ प्राध्यापक; विद्यापीठाकडून जाहिरात प्रसिद्ध Brought to You By : Bharat Live News Media.