शंभराव्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ; स्वागताध्यक्षपदी शरद पवार

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा अध्यक्ष मेघराज राजेभोसले, विजय पटवर्धन आणि दीपक रेगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम दि 5 जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. या सोहळ्यानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, निमंत्रक उदय सामंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
सकाळी 8 वाजता, पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश कला क्रीडा मंचापर्यंत ढोलताशांच्या गजरात दुचाकी आणि रथावर विराजमान झालेल्या ज्येष्ठ कलाकारांची रॅली असणार आहे. या सोहळ्यात रंगमंच पूजन, नाट्य संकीर्तन, बहुरूपी भारुड, ‘नाटक : माझ्या चष्यातून’ हा परिसंवाद, 40 नृत्यांगनांच्या संचासह पारंपरिक लावण्यांचा कार्यक्रम, दीडशेहून अधिक कलाकारांच्या ताफ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा नयनरम्य शिवराज्याभिषेक सोहळा, ‘नाट्यधारा’ हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम, नाट्यगीतांचा कार्यक्रम, संगीत रजनी लखलख चंदेरी हे कार्यक्रम होणार आहेत.
उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त आणि शंभराव्या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, नाट्य संमेलनाचे निमंत्रक आणि उद्योगमंत्री उदय सामंत विशेष अतिथी म्हणून तर 99 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी आणि 100 व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शशी प्रभू, डॉ. रवी बापट, विश्वस्त मोहन जोशी, अशोक हांडे, गिरीश गांधी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि नरेश गडेकर, कोषाध्यक्ष सतीश लोटके, नाट्य परिषद, पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा
पुरंदरमध्ये 32 हजारांहून अधिक बोगस मतदार : विजय शिवतारे यांची तक्रार
Weather Update : पुणे 11.9 अंशावर, राज्यात नीचांकी
वडणगेतील प्रेरणला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक
Latest Marathi News शंभराव्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ; स्वागताध्यक्षपदी शरद पवार Brought to You By : Bharat Live News Media.
