नगरमध्ये व्यावसायिकावर गोल्डन हनी ट्रॅप

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : सोशल मीडियावर जवळीक साधून शहरातील सराफ व्यावसायिकाला पैशासाठी हनी ट्रॅपमध्ये अडकवून दहा लाखांची मागणी केल्याच्या आरोपावरून प्रेमदान हडको येथील एका महिलेसह तिच्या दोन नातेवाईक महिला व एका पुरुषाविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की प्रेमदान हडकोतील एका महिलेने मे 2023 मध्ये मला सोशल मीडियावर मैत्रीची विनंती पाठविली. ती मी स्वीकारली. त्यानंतर तिने माझा मोबाईल नंबर मिळविला. सोशल मीडियावरच ती मला मेसेज पाठवू लागली. मीही त्याला प्रतिसाद दिला. तिने भेटायला बोलावले. पण भेटीला मी नकार दिला. त्यानंतर ती चितळे रस्त्यावरील दुकानात मला भेटण्यासाठी आली. गोड गोड बोलू लागली. तिने अडीच ग्रॅमची 12 हजार 500 रुपयांची सोन्याची अंगठी घेतली. त्याचे फक्त तीन हजार रुपये दिले. उर्वरित पैसे तुम्ही द्या, असे सांगून ती निघून गेली. त्यानंतर ती महिला ‘तुझ्यावर प्रेम आहे,’ असे म्हणत गोड बोलू लागली. एकदा तिने मला गांधी मैदानात भेटण्यास बोलावले. तिथे गेल्यानंतर सोशल मीडियावरील मेसेज व्हायरल करण्याची धमकी देऊन 10 हजार रुपयांची मागणी केली. विनाकारण बदनामी नको म्हणून मी दहा हजार रुपये दिले.
संबंधित बातम्या :
अयोध्या काय जगातील कोणत्याही मंदिरात जाईन ; आमंत्रण तरी येऊ दे : खासदार सुप्रिया सुळे
आमदार राजळेंकडून लोकशाहीची हत्या : अॅड. प्रताप ढाकणे
Rajasthan Cabinet Expansion : अखेर राजस्थान मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, २२ मंत्र्यांनी घेतली शपथ
त्यानंतरही तिने मेसेज पाठवले आणि एका राजकीय नेत्याचे नाव घेऊन ‘तुझा त्याच्यासारखा व्हिडिओ माझ्याकडे आहे,’ असे सांगून बदनामी करण्याची धमकी दिली. वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून माझ्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, 10 डिसेंबर रोजी अनोळखी मोबाईल नंबरवरून कॉल करून तिने भेटण्यास बोलावले. न आल्यास दोघांमधील मेसेज व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने पाईपलाईन रस्त्यावरील एका कॅफेमध्ये बोलावले. तिथे महिला तिच्या नातेवाईक असलेल्या दोन मुली होत्या. त्या वेळी ‘या मुलीच्या नावावर प्रत्येकी 5 लाख रुपये टाक, नाहीतर माझ्याशी लग्न कर,’ असे म्हणत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची धमकी दिली. त्याचवेळी तिथे एक पुरुषही आला. महिलेला पैसे देण्याबाबत धमकावले. मात्र, मी तेथून निघून गेलो. त्यानंतर ती महिला नातेवाइकासह 16 डिसेंबर रोजी चितळे रस्त्यावरील दुकानात आली. वडील व कामगार यांच्यासमोर तिने पैशांची मागणी केली. नंतर 18 डिसेंबर रोजी पुन्हा दुकानात येऊन त्या महिलेने धमकी दिली.
‘त्या’ व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
पीडित महिलेने त्या व्यावसायिकाविरुद्ध अत्याचार व अॅट्रॉसिटीच्या कायद्यानुसार फिर्याद दिली असून, तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात त्या व्यावसायिकासह चार जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे. प्रेमसंबंधातून वारंवार अत्याचार केल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.
Latest Marathi News नगरमध्ये व्यावसायिकावर गोल्डन हनी ट्रॅप Brought to You By : Bharat Live News Media.
