आपला दवाखान्याच्या प्रतीक्षेत नागरिक; आतापर्यंत एकच दवाखाना
पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील नागरिकांना आपल्या घराजवळच वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेच्या वतीने नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र (हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर) आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे. आतापर्यंत चिखली-जाधववाडी येथे एकच आपला दवाखाना सुरू झाला आहे. तर, शहरातील विविध भागात 5 हेल्थ आणि वेलनेस सेंटर सुरू करण्यात आले आहेत. अन्य दवाखाने अणि वेलनेस सेंटर कधी सुरू होणार, याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.
11 महिन्यांचा भाडेकरार करणार
हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर व आपला दवाखानासाठी जागा देणार्या मालकांसोबत 11 महिन्यांचा भाडेकरार केला जाणार आहे. आवश्यकतेनुसार मुदतवाढ दिली जाईल. भाडेतत्त्वावर द्यावयाच्या मालमत्ता किंवा मिळकतीचे सर्व कर, पाणीपट्टी, विद्युत देयके करारनामा करण्याच्या तारखेपर्यंत भरलेली असणे आवश्यक आहे. भाडेकरार केल्याच्या तारखेपासुन करार संपुष्टात येण्याच्या तारखेपर्यंत येणारी सर्व विद्युत व पाणीपट्टी देयके महापालिका वैद्यकीय विभाग भरणार आहे. मात्र, मिळकत कर, देखभाल दुरुस्ती खर्च व भाडेकरार करण्यासाठीचा खर्च जागा मालकाने करायचा आहे. बाजारभावाप्रमाणे अथवा महापालिकेने निश्चित केलेल्या दराने दरमहा भाडे दिले जाणार आहे.
दवाखान्यांची संख्या वाढविण्याची गरज
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या 27 लाखांवर जाऊन पोहोचली आहे. महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह 8 रुग्णालये कार्यरत आहेत. अजमेरा कॉलनी येथे एक नेत्ररुग्णालय आहे. तर, विविध भागांमध्ये 29 दवाखाने आहेत. शहराचा वाढता विस्तार आणि आरोग्य सुविधांची वाढती गरज लक्षात घेता दवाखान्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
112 दवाखान्यांचे नियोजन
चिखली-जाधववाडी येथे सध्या आपला दवाखाना सुरू केला आहे. तेथे मोफत वैद्यकीय सुविधा दिल्या जात आहेत. तर, 5 ठिकाणी हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर सुरू केले आहेत.
चिखली, भोसरी, दापोडी मेट्रो स्थानकाजवळ, वाकड दवाखाना, खिंवसरा पाटील दवाखाना आदी ठिकाणी हे सेंटर सुरू केले आहेत. तेथे महापालिकेने निश्चित केलेल्या दरानुसार शुल्क आकारले जात आहे.
शहरामध्ये महापालिकेकडून 33 आपला दवाखाना आणि 79 हेल्थ आणि वेलनेस सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी घोषित आणि अघोषित झोपडपट्ट्यांजवळील 94 जागांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
महापालिकेकडून जिथे जागा उपलब्ध होतील तिथे आणि जिथे उपलब्ध होणार नाही, अशा ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयांमार्फत खासगी जागा भाडेतत्त्वावर घेऊन दवाखाने सुरू केले जाणार आहे. क्षेत्रीय समिती त्यासाठी जागा निश्चित करणार आहे.
हेही वाचा
अभिमानास्पद ! ‘शर्विका’ची 100 व्या किल्ल्याला गवसणी
सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारणीस अखेर मुहूर्त
देवापेक्षा त्याचे भक्त मोठे असतात : नामदेवशास्त्री महाराज
Latest Marathi News आपला दवाखान्याच्या प्रतीक्षेत नागरिक; आतापर्यंत एकच दवाखाना Brought to You By : Bharat Live News Media.