शेणापासून बनवली वीज!
नवी दिल्ली : शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात मुलं अनेक प्रयोग सादर करीत असतात. त्यामध्ये वीजनिर्मितीचेही अनेक प्रकार असतात. राखेपासून किंवा बटाट्यापासूनही वीजनिर्मिती करून दाखवली जाते. आता एका तरुणाने शेण व वॉशिंग पावडरचा वापर करून वीजनिर्मिती करून दाखवली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की आपल्या देशात एकापेक्षा एक ‘जुगाडू’ लोक आहेत. ही मंडळी असे असे जुगाड शोधून काढतात की पाहणारासुद्धा अवाक् होईल. होय, असाच एक पार चक्रावून टाकणारा जुगाड समोर आला आहे. या तरुणाने चक्क शेणापासून वीज तयार करून दाखवली आहे. वॉशिंग पावडर आणि शेणाच्या मिश्रणापासून वीज तयार करता येऊ शकते, असा दावा तो करत आहे. त्याने सर्वात आधी एका भांड्यात पाणी घेतलं. मग त्यामध्ये शेण, मीठ आणि कपडे धुण्याची पावडर मिक्स केली.
दुसर्या भांड्यात पाण्यात मिसळलेला एक रंग असतो. मग या दोन्ही भांड्यांमध्ये त्याने विजेची तार टाकली. बसं, काही क्षणात तयार झाली वीज. या विजेवर पंखा, बल्ब, मोबाईल फोन अशी विविध विद्युत उपकरणं तो चालवून दाखवत आहे. अन् आश्चर्याची बाब म्हणजे खरंच पंखा फिरताना दिसतोय, बल्ब पेटला आहे आणि मोबाईलमध्ये चार्जिंग होतो! एका ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ 2 लाखांपेक्षा अधिक नेटकर्यांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच जण ‘शॉक’ आहेत. कारण अशा पद्धतीने वीज तयार करता येऊ शकते हे खरंच आश्चर्यजनक आहे. काही जणांच्या मते, हा व्हिडीओ फेक आहे!
Latest Marathi News शेणापासून बनवली वीज! Brought to You By : Bharat Live News Media.