पुणेकरांनो लक्ष द्या ! पाणीपट्टी थकवल्यास दरमहा एक टक्का दंड
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिकेची पाणीपट्टी थकल्यानंतर आजवर व्याज आकारले जात नव्हते. मात्र, महापालिकेने थकीत पाणी बिलाच्या रकमेवर दरमहा एक टक्का दराने दंडात्मक व्याज आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाण्याची बिले थकविणे आता महागात पडणार आहे. महापालिका हद्दीतील सर्व व्यावसायिक व काही निवासी मिळकतींना आणि खडकी व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील सर्व मिळकतींना मीटरद्वारे पाण्याच्या बिलाची आकारणी होत आहे.
पाण्याच्या थकित बिलावर कोणतीही व्याजाची आकारणी करण्यात येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बिलाच्या रकमेची थकबाकी वसुल होणे बाकी आहे. यामुळे महापालिकेने थकबाकीवर दंडात्मक व्याज आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मीटर बिलाच्या दिनांकापासून 60 दिवसांत बिल न भरल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार थकबाकी रकमेवर प्रतिमहा एक टक्का दराने दंडात्मक व्याज आकारले जाणार आहे.
मीटरद्वारे पाणीपुरवठा होणार्या सर्व मिळकतींना बिले देण्याची व्यवस्था केली आहे. संबंधितांना बिले न मिळाल्यास 31 जानेवारी 2024 पर्यंतचे पाण्याचे मीटर बिल लष्कर पाणीपुरवठा विभाग, स्वारगेट पाणीपुरवठा विभाग, एसएनडीटी-चतुश्रुंगी पाणीपुरवठा विभाग, येथून घेऊन जावे. तसेच 31 जानेवारीपर्यंत बिलाचा भरणा करावा, त्यानंतर दंडात्मक व्याज आकारले जाईल.
– नंदकुमार जगताप, विभागप्रमुख, पाणीपुरवठा, महापालिका.
एलईडी पथदिव्यांच्या प्रकल्पात त्रुटी
शहरातील रस्त्यांवरील जुने पथ दिवे काढून नवीन एलईडी दिवे बसविण्याच्या प्रकल्पात त्रुटी ठेवून निविदेतील अटी व शर्तींचा भंग केल्याने महापालिकेकडून संबंधित कंपनीला नोटीस बजावण्यात येणार आहे. वीज बचत करून खर्च कमी करण्यासाठी महापालिकेने 2016 मध्ये नवीन एलईडी बसविण्यासाठी निविदा काढली. या निविदेमध्ये सोडिअम व्हेपर, मेटल हलाईट, इंडक्शन हे दिवे काढून त्या जागी एलईडी फिटिंग बसवणे, प्रकल्प उभारणी करणे, चालवणे आणि वेळोवेळी तंत्रज्ञान बदल करणे, सहा वर्षांनी फिटिंग बदलणे, यांसह विविध बाबींचा समावेश निविदेमध्ये होता.
या निविदा प्रक्रियेत ज्या कंपनीला काम मिळाले, त्या कंपनीने शहरामध्ये एकूण 90 हजार 325 एलएडी दिवे बसविले. मात्र, संबंधित कंपनीने निविदेमधील टी 5 दिवे लावले नाहीत. शहरात 1800 फिडर पिलर बसवणे आवश्यक असताना पूर्तता केली नाही. वीस मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांवर डायमेबल फिटिंग बसवणे अपेक्षित असताना त्या बसविल्या गेल्या नाहीत, मात्र, त्या बसवल्याचे सांगून महापालिकेची दिशाभूल केली. तंत्रज्ञानात बदल होत असल्यामुळे 150 ते 160 ल्युमिनक्सच्या फिटिंग बसविण्याऐवजी 100 ल्युमिनक्सच्या फिटिंटग बसविल्या. याप्रकरणी महापालिकेने संबंधीत कंपनीला 28 डिसेंबर 2022 रोजी निविदेतील अटी व शर्तींचा भंग केल्याबद्दल पत्र पाठविले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे संबंधित कंपनीला महापालिकेच्या विद्युत विभागाकडून लवकरच नोटीस देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
हेही वाचा
मागोवा 2023 : पुणेकरांना नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीची प्रतीक्षाच
Raigad | ताम्हिणी घाटात ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, २ ठार, ५५ जखमी
वाहने अडविण्याचा प्रयत्न केला तर फडणवीसांच्या दारात बसू!
Latest Marathi News पुणेकरांनो लक्ष द्या ! पाणीपट्टी थकवल्यास दरमहा एक टक्का दंड Brought to You By : Bharat Live News Media.