पिंपरी-चिंचवडमध्ये झिकाचा रुग्ण नाही
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात झिकाचा एकही रुग्ण तूर्तास आढळलेला नाही. तथापि, पुणे येथील रुग्णाला पिंपरी-चिंचवडमधील सांस्कृतिक कार्यक्रमाला आल्यानंतर झिकाची लागण झाल्याची शक्यता लक्षात घेता त्यादृष्टीनेदेखील तपास घेतला जात आहे. त्याला अनुसरून महापालिका वैद्यकीय विभागाने आकुर्डी रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय आणि तालेरा रुग्णालय झोनला दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुण्यातील येरवडा परिसरात एका 64 वर्षीय ज्येष्ठ महिलेला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर तिला ताप आल्याने या संसर्गाला पिंपरी-चिंचवडचे कनेक्शन तर नाही ना याचा तपास घेतला जात आहे. तसेच, संबंधित महिला काही दिवसांपूर्वी केरळला गेल्याचेही समोर आले आहे.
झिका आजार कसा होतो ?
झिका विषाणू रोग किंवा झिका ताप हा एडिस प्रजातीच्या डासांच्या चावण्याने होतो. एडिस डास प्रामुख्याने दिवसा चावतात. झिका विषाणू हा आजार असलेल्या व्यक्तीला चावलेल्या डासांमध्ये प्रवेश करतो. जेव्हा संक्रमित डास दुसर्या निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा विषाणू त्या व्यक्तीच्या रक्तप्रवाहात प्रवेश करतो. त्याचा परिणाम म्हणून हा संबंधित व्यक्तीला आजार होतो.
एनआयव्हीला रक्ताचे नमुने पाठविण्याच्या सूचना
याबाबत अधिक माहिती देताना अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार म्हणाले, की आकुर्डी येथील सांस्कृतिक कार्यक्रमाला केरळवासीय नागरिक एकत्र जमले होते. त्या कार्यक्रमाला उपस्थित पुण्यातील झिका संसर्ग झालेल्या रुग्णाला कार्यक्रमानंतर ताप व अन्य लक्षणे आढळून आली आहेत. ही बाब लक्षात घेता झिका संशयित रुग्ण आढळत असल्यास त्यांचे रक्त तपासणी चाचणी अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला (एनआयव्ही) पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या शहरात झिकाचा रुग्ण आढळलेला नाही. तथापि, आकुर्डी रुग्णालय, तालेरा रुग्णालय आणि यमुनानगर रुग्णालय झोनला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काय काळजी घ्याल
डासोत्त्पत्ती रोखण्यासाठी घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका
नारळाच्या करवंट्या, घरातील कुंड्या, कुलर, फ्रीज यातील साचलेले पाणी रिकामे करा
सर्व पाण्याच्या टाक्या व कंटेनरवर घट्ट झाकण ठेवा
डास चावण्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी लांब आणि सैल कपडे घाला
झोपताना मच्छरदाणीचा वापर करा
The post पिंपरी-चिंचवडमध्ये झिकाचा रुग्ण नाही appeared first on पुढारी.
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात झिकाचा एकही रुग्ण तूर्तास आढळलेला नाही. तथापि, पुणे येथील रुग्णाला पिंपरी-चिंचवडमधील सांस्कृतिक कार्यक्रमाला आल्यानंतर झिकाची लागण झाल्याची शक्यता लक्षात घेता त्यादृष्टीनेदेखील तपास घेतला जात आहे. त्याला अनुसरून महापालिका वैद्यकीय विभागाने आकुर्डी रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय आणि तालेरा रुग्णालय झोनला दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुण्यातील येरवडा परिसरात एका 64 …
The post पिंपरी-चिंचवडमध्ये झिकाचा रुग्ण नाही appeared first on पुढारी.