महसुली दर्जा मिळाला, पण ग्रामपंचायत होईना !

देवठाण : Bharat Live News Media वृत्तसेवा : देवठाणचे विभाजन करून वरखडवाडी आणि दोडकनदी आदिवासी वाड्यांना दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र महसूली गावाचा दर्जा मिळाला पण अजूनही या गावांना स्वतंत्र ग्रामपंचायती नाहीत. स्वतंत्र ग्रामपंचायती व्हाव्यात म्हणून दोन वर्षापासून गावकरी पाठपुरावा करीत असून महसूल, भूमी अभिलेख, व जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडून सातत्याने टाळाटाळ होत आहे. याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी आदिवासी समाज आंदोलन करणार असल्याची माहिती पांडुरंग मेंगाळ यांनी दिली. देवठाणची लोकसंख्या दहा हजाराहून जास्त आहे.
त्यातील बहुतांश समाज हा आदिवासी ठाकर आहे. हा समाज दोडकनदी, वरखडवाडी परिसरात निवासी आहे. गाव आदिवासी उपयोजन क्षेत्रात अर्थात पैसा क्षेत्रात समाविष्ट नाही. त्यामुळे गावातील आदिवासी समाजाला आदिवासी विभागाच्या विविध योजना लागू होत नाही. देवठाणच्या ग्रामसभेने तीन वर्षापूर्वी स्वतंत्र महसुली गावे निर्माण व्हावीत म्हणून एकमुखाने ठराव केला होता. त्यानुसार 22 डिसेंबर 2021 रोजी अधिसूचना काढून दोडकनदी व वरखडवाडी या आदिवासी वाड्यांना स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देण्यात आला आहे. स्वतंत्र गावाचा दर्जा मिळाल्यानंतर 10 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या ग्रामसभेत देवठाण ग्रामपंचायत विभाजन करून वरखडवाडी आणि दोडकनदी स्वतंत्र ग्रामपंचायती करण्यात याव्यात असा ठराव संमत झाला होता.
महसूल खात्याने देवठाण येथील कामगार तलाठी व ग्रामविकास अधिकारी यांना स्थानिक पातळीरील दप्तर स्वतंत्र तयार करण्याचे आदेश देण्यात आले, परंतु वर्षभरात हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्रस्ताव अपूर्ण अवस्थेत आहे. गावकर्यांनी आंदोलनाचा इशारा देताच त्याला गती मिळाली पण अजूनही काम अपूर्णच आहे. स्वतंत्र ग्रामपंचायती व स्वतंत्र महसुली गाव प्रस्तावाचा दप्तरी ताळमेळ अद्याप बसवलेला नाही. ग्रामसेवक व तलाठी यांनी प्रस्ताव पूर्ण करावा, अशी मागणी गावकरी करत आहेत.
स्वतंत्र ग्रामपंचायती निर्माण व्हावी, अशी मागणी कॉम्रेड तुळशीराम कातोरे, मदन पथवे, आनंदा गिरे, अहिलाजी गांगड, राजेंद्र उघडे, एकनाथ पथवे, खेमा पथवे, हौशीराम कातोरे, नारायण पथवे, कोंडाजी गांगड, मुरलीधर पथवे, पोपट गांगड, रामभाऊ पथवे यांनी केली आहे.
Latest Marathi News महसुली दर्जा मिळाला, पण ग्रामपंचायत होईना ! Brought to You By : Bharat Live News Media.
