Nagar : खरेदी-विक्री संघ मतदारयादीची होळी

पाथर्डी तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा : सभासदांना विश्वासात न घेता खरेदी विक्री संघातील कार्यरत सभासदांना वगळण्यात आले असून, हुकूमशाही पद्धतीने सर्व कारभार सुरू आहे. आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासनाला हाताशी धरून सभासद मतदारांची संख्या सावधपणे कमी केली. आपल्या मर्जीतील सभासद त्यामध्ये ठेवले आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने पाथर्डी येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर मतदारयादीची होळी करून निषेध केला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, माजी नगरसेवक बंडू बोरूडे, सीताराम बोरूडे, दिगंबर गाडे, शहराध्यक्ष योगेश रासने, देवा पवार, चांद मनियार, सचिन नागपुरे, बाळासाहेब घुले, सागर इधाटे, हुमायून आतार, जालिंदर काटे, रवींद्र पालवे, अक्रम आतार, राजेंद्र बोरूडे, विनय बोरूडे आदी उपस्थित होते.
तालुका खरेदी-विक्री संघाचा निवडणूक कार्यक्रम लागला असून, 29 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, निवडणुकीबाबत संस्थेचे सभासद, राजकीय पक्षांना कोणतीही कल्पना येऊ दिली नाही. जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांना हाताशी धरून व सत्तेचा दुरूपयोग करून हा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला. याच्या निषेधार्थ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी दुपारी येथील सहायक निबंधक निवडणूक कार्यालयासमोर निवेदन देत मतदारयादीची होळी केली.
यावेळी माजी संचालक सीताराम बोरूडे म्हणाले, पूर्वी संस्थेची सभासद संख्या 2300 होती. मात्र, आमदार राजळे यांनी संस्था व तालुका सहायक निबंधक यांना हाताशी धरून, जवळपास एक हजार सभासद कमी केले. सुमारे एक हजार सभासद आपल्या मर्जीतले ठेवले असून, विरोधकांना सभासद नोंदणी संदर्भात कोणती सूचना देण्यात आलेली नाही. सभासदांना बेसावध ठेवून आपल्या मर्जीतील तीन-चार गावातीलच सभासदांना कायमस्वरूपी करण्यात आले. सहकार विभागाने या संपूर्ण गैरकारभाराची दखल घ्यावी आणि सर्व सभासदांना न्याय देण्यात यावा. तोपर्यंत निवडणूक स्थगित करून सर्व सभासदांना पूर्वकल्पना देऊन या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेऊ.
Latest Marathi News Nagar : खरेदी-विक्री संघ मतदारयादीची होळी Brought to You By : Bharat Live News Media.
