Nagar : अखेर ‘त्या’ पोलिसाला पदोन्नती !

पाथर्डी तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा : पदोन्नतीसाठी पात्र असताना आपल्याला डावलले गेले. पदोन्नतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत हेड कॉन्स्टेबल रामनाथ भाबड यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिस दल खडबडून जागे झाले आणि ‘त्या’ यादीमध्ये सुधारणा करत भाबड यांना पदोन्नती देण्यात आली. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या स्वाक्षरीने 26 डिसेंबरला नवीन पदोन्नती यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पोलिस कर्मचार्यांच्या पदोन्नतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, दोन दिवसांत पदोन्नतीची यादी न बदलल्यास, आत्मदहन करण्याची धमकी पाथर्डी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या हेड कॉन्स्टेबल भाबड यांनी पंधरा दिवसांपूर्वी दिली होती. या धमकीच्या लेखी पत्राने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली होती. भाबड यांनी आत्महत्या करणार असल्याचे निवेदन पोलिस अधीक्षकांना दिले होते. दोन दिवसांत प्रमोशन न मिळाल्यास आपण अज्ञात ठिकाणी आत्मदहन करू, असे त्यांनी पत्रात म्हटले होते.
संबंधित बातम्या :
कुणी रोप देता का रोप? शेतकरी रानोमाळी शोधताहेत उन्हाळी कांद्याचे रोप
जनतेचा आक्रोश भाजपला सत्तेवरून खाली खेचेल : खा. डॉ. अमोल कोल्हे
लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी आता २२ जानेवारीला
त्यानंतर आता पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या स्वाक्षरीने जिल्ह्यातील पोलिस कर्मचार्यांना पदोन्नत्या देऊन, त्यांच्या बढतीची नवीन यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये रामनाथ भाबड यांना हेड कॉन्स्टेबल या पदावरून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर बढती देण्यात आली आहे. नवीन यादीत जे खरे पात्र होते, त्यांना यामध्ये सामावून घेण्यात आले आहे. तर, जुन्या यादीतील प्रमोशन देण्यात आलेल्या पोलिस कर्मचार्यांना वगळून पुन्हा एकदा नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भाबड यांनी आत्मदहन करण्याचे पत्र दिल्यानंतर त्याची प्रसारमाध्यमांनी दखल घेत त्याला वाचा फोडली होती. त्यानंतर ही दुरुस्ती करून पदोन्नतीचा तिढा सोडविला गेला. सध्या रामनाथ भाबड हे पाथर्डी पोलिस ठाण्यात कार्यरत असून, ते 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना पदोन्नती मिळाली असलीतरी, केवळ पाच दिवसांसाठी सहायक पोलिस उपनिरीक्षक हे पद भूषविता येणार आहे. मात्र, सेवानिवृत्तीनंतर भाबड यांना या पदोन्नतीचा फायदा होऊन, त्यांच्या पेन्शनच्या वेतनात कायमस्वरूपी वाढ होणार आहे.
Latest Marathi News Nagar : अखेर ‘त्या’ पोलिसाला पदोन्नती ! Brought to You By : Bharat Live News Media.
