जुन्नर तालुक्यात कांदा लागवड अंतिम टप्प्यात

नारायणगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : जुन्नर तालुका हा कांद्याचे आगर म्हणून ओळखला जातो. धोलवड पट्टा कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. या भागात सध्या कांदा लागवड अंतिम टप्प्यात आहे. काळवाडी, पिंपळवंडी, पिंपरी पेंढार, खामुंडी परिसरात यंदा कांद्याची लागवड जवळपास निम्म्याने घटली आहे. तालुक्यात आतापर्यंत सहा हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. अद्याप एक हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात लागवड होऊ शकते. यंदा कमी झालेला पाऊस, सरकारचे निर्यातबंदीचे धोरण, वाढता भांडवली खर्च, वाढती मजुरी याचा परिणाम कांदा लागवडीवर झाला आहे.
पिंपळगाव जोगा कालव्याच्या उत्तरेकडील भागात पाऊस कमी झाल्याने विहिरी डिसेंबरच्या मध्यापासूनच कोरड्या पडू लागल्या आहेत. कालव्यालादेखील पुरेसे पाणी न आल्याने या भागातील शेतकर्यांनी यंदा कांद्याकडे पाठ फिरवली आहे. पाणलोट क्षेत्र असलेल्या काळवाडी, पिंपळवंडी, उंब—ज भागातील कांदा लागवडीवर देखील परिणाम झाला आहे. वाढती मजुरी व भांडवलाचा परिणाम लागवडीवर झाला आहे. कांद्याची रोपे उपटायला 350 रुपये, लागवडीला 400 रुपये मजुरी आहे. खत, औषधांच्या वाढत्या किमतीचा विचार केल्यास कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते. मात्र, कांद्याला बाजारभाव पंधरा ते वीस रुपये मिळत असल्याने यंदा कांदा लागवड घटली आहे, असे शेतक-यांनी सांगितले. सरकारचे चुकीचे धोरण, पाण्याचा अभाव आणि वाढता भांडवली खर्च या कारणांमुळे यंदा कांदा लागवड निम्म्याने कमी झाली आहे.
खत, औषध विक्रीवर परिणाम
कांदा लागवड कमी झाल्याने दरवर्षी कांदा लागवडीच्यावेळी जी खतांची आणि औषधांची विक्री होते त्यात निम्म्याने घट झाली आहे. खते व औषधांच्या वाढत्या किमती आणि शेतीमालाचा घटलेला बाजारभाव यांचा परिणाम यंदा लागवडीवर झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
Latest Marathi News जुन्नर तालुक्यात कांदा लागवड अंतिम टप्प्यात Brought to You By : Bharat Live News Media.
