मनमाडला इंधनवाहिनीतून गळती अन् धावपळ

मनमाड (जि. नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा; इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांच्या इंधनवाहिनीला खादगाव शिवारात अचानकपणे गळती…तत्काळ तिन्ही कंपनीच्या आपत्कालीन टीम घटनास्थळी दाखल….तत्काळ बॅरिकेडिंग करून लिकेज बंद करण्याचा प्रयत्न… मात्र आगीचा भडका…पुन्हा एकदा धावपळ….मनमाड, नांदगाव येथील अग्निशमन दलाचे जवानही मदतीसाठी धावतात…अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण….दुर्घटनेत फक्त एक जण किरकोळ जखमी….आग आटोक्यात आणून पाइपलाइन दुरुस्ती करण्यात येते….हा थरार खादगाव नागापूर गावच्या नागरिकांनी अनुभवला…..मोहीम फत्ते झाल्यानंतर हे केवळ मॉकड्रिल आहे, हे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या इंधन कंपन्यांत एक छोटीशी चुकसुध्दा मोठी दुर्घटना घडवू शकते. मात्र याची सुरक्षा आपल्या सर्वांच्या हातात आहे. यामुळे दरमहा, तिमाही, सहामाही व वार्षिक असे मॉकड्रिल घेऊन सज्जतेचा आढावा घेतला जातो. इंधन कंपनीच्या आतमध्ये अनेकदा हे प्रात्यक्षिक घेण्यात येतात. मात्र जेथून ही इंधनवाहिनी येते, तिथे दुर्घटना घडली तर काय उपाययोजना कराव्यात, यासाठी गुरुवारी (दि.२८) इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांची खादगाव शिवारातील इंधनवाहिनीच्या ठिकाणी प्रात्यक्षिक घेतले. शेतकरी विहीर खोदत असताना इंधनवाहिनी फुटून गळतीचा प्रसंग तयार करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करण्यात आली. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना नसल्याने अनेकांना खरोखरच आग लागल्याचे वाटले. मात्र सर्व प्रकार हा मॉकड्रिल असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मॉकड्रिलमध्ये यावेळी डिशचे उपसंचालक प्रवीण पाटील, डीडीएमए एस. देशपांडे, मुख्य अग्निशमन अधिकारी एस. डी.पवार, पीआय बी. बी.थोरात, खादगावच्या सरपंच सुनीता वडक्ते, नागापूरचे सरपंच राजेंद्र पवार, आयओसीएल मनमाड टर्मिनलचे जीएम आनंदा बर्मन आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा :
Rajinikanth : ‘माझे हृदय तुटले आहे, विजयकांतकडे प्रचंड इच्छाशक्ती होती’
वस्तुसंग्रहालयांशी वाढला संवाद; ऐतिहासिक वस्तूं पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या, अमेरिकेच्या आणखी एका राज्याने निवडणुकीसाठी ठरवले अपात्र
Latest Marathi News मनमाडला इंधनवाहिनीतून गळती अन् धावपळ Brought to You By : Bharat Live News Media.
