गौतम अदानी यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनी गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या भेटी दरम्यान खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या. पवार आणि अदानी यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याचा खुलासा झालेला नाही.
काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांकडून केंद्र सरकार आणि भाजपसोबतच्या घनिष्ठ संबंधांवरून अदानी आणि त्यांच्या उद्योगसमूहावर टीका होत असते. त्यातच धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अलीकडेच शिवसेना ठाकरे गटाने अदानींविरोधात मोर्चा काढला होता. काँग्रेस पाठोपाठ महाविकास आघाडीतील शिवसेनाही अदानींच्या विरोधात असताना शरद पवार यांनी मात्र अदानीविरोधी भूमिकेला वारंवार छेद दिला.
ठाकरेंचा धारावी मोर्चा ताजा असतानाच मागील आठवड्यात शरद पवार यांनी गौतम अदानी यांचे कौतुक केले होते. बारामती येथील टेक सेंटरच्या निर्मीतीत 25 कोटींच्या योगदानाबद्दल शरद पवारांनी अदानी यांचे आवर्जून आभार मानले होते. महाविकास आघाडीतील अन्य पक्षांनी अदानींबाबत घेतलेली भूमिका मान्य नसल्याचेच पवार यांनी एका अर्थाने अधोरेखित केले आहे.
Latest Marathi News गौतम अदानी यांनी घेतली शरद पवारांची भेट Brought to You By : Bharat Live News Media.
