Inspirational Story : रत्नागिरीची अनन्या देतेय देशाला शिक्षण प्रेरणा

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : आपल्या अशिक्षित वयोवृद्ध आजी-आजोबांसाठी स्वयंसेवक बनून त्यांची शिकण्याची इच्छा पूर्ण करीत असलेल्या रत्नागिरी येथील दहावीतल्या अनन्या चव्हाण हिच्या प्रेरणादायी कलाकृतीची दखल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतली आहे. तिने रेखाटलेले संकल्पचित्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने टि्वट केले आहे. तसेच, उल्लास या नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या फेसबुक पेजवर पोस्ट करून तिची प्रशंसा केली आहे. अनन्याला शाळेचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांच्याकडून नवभारत साक्षरता मोहिमेची माहिती मिळाली. त्यानंतर तिने आपले अशिक्षित आजी-आजोबांना शिकविण्याचा निर्धार केला.
वेळ मिळेल तसे ती त्यांना साक्षरतेचे धडे देऊ लागली. त्याचबरोबर आजी-आजोबांना शिकवतानाचे आपले स्केच तिने पाटीवर रेखाटले. तिच्या या कलाकृतीची दखल सर्वांनी घ्यावी, तसेच आपापल्या घरातील अशिक्षित सदस्यांना शिक्षित करण्यासाठी इतरांनीही प्रेरणा घ्यावी म्हणून तिचे कलाशिक्षक अनिल सागवेकर यांनी हे चित्र तिला वर्गातील फलकावर काढावयास सांगितले. तिने साकारलेले रेखाचित्र हळूहळू शाळेत आणि राज्यभर व्हायरल झाले. रत्नागिरी डायटचे अधिव्याख्याता तथा या मोहिमेचे जिल्हा समन्वयक राजेंद्र लठ्ठे यांनी हे छायाचित्र राज्य योजना उपसंचालक राजेश क्षीरसागर यांना पाठवले.
त्यांनी ते केंद्रीय शिक्षण मंत्रालयास पाठवले असता दिल्लीनेही तिच्या कलाकृतीची दखल घेऊन सर्वांसाठी ते टि्वटर व फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे. उल्लास- नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत कुटुंबातील अशिक्षित सदस्यांना साक्षर करणे अभिप्रेत आहे.
नेमकी हीच बाब सार रूपाने या कलाकृतीतून अनन्याने दर्शविली आहे. ’चला भारत घडवू या’ असे शीर्षक देऊन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने तिने काढलेले संकल्पचित्र टि्वट केले आहे. या योजनेत केंद्राने दखल घेतलेली राज्यातील ही तिसरी कलाकृती आहे. या योजनेत ’जन जन साक्षर’ ही केंद्र शासनाची, तर ’साक्षरतेकडून समृद्धीकडे’ ही राज्याची टॅगलाईन आहे.
कुटुंबातील अशिक्षितांना साक्षर करण्यासाठी शिक्षित व्यक्तींनी पुढाकार घ्यायला हवा. तसेच त्यांची जवळच्या शाळेकडे ऑनलाइन नोंदणी करावी.
– डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना), पुणे
हेही वाचा
DMDK पक्षाचे प्रमुख विजयकांत यांचे निधन, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर होते व्हेंटिलेटरवर
पुणे विभागात रब्बी पेरणी 79 टक्के
Weather Update : किमान तापमानात किंचित वाढ
Latest Marathi News Inspirational Story : रत्नागिरीची अनन्या देतेय देशाला शिक्षण प्रेरणा Brought to You By : Bharat Live News Media.
