निफाडकडून नाशिककडे जाणाऱ्या कारमध्ये 38 लाखांचा गांजा

निफाड(जि.नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा- छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाडकडून नाशिककडे जाणाऱ्या कारमध्ये गांजा पकडण्यात आला. सोमवारी (दि. 25) पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
काही संशयित गांजा तस्करी करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने चांदोरी चौफुली परिसरात नाकाबंदी करून नाशिककडे येणारे वाहन (क्रमांक एमएच 20, सीयू 7070) थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने भरधाव वाहन चालवून नाशिककडे पलायन केले. पथकाने पाठलाग केला, परंतु तो मिळून आला नाही. पोलिसांनी नाशिककडे जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून वाहनाचा शोध घेतला असता, ते नाशिक शहरातील आरटीओ ऑफिस परिसरातील घुंगरू बारजवळ बेवारस स्थितीत मिळून आले. वाहनाची झडती घेतली असता, त्यात प्लास्टिकच्या 12 गोण्यांमध्ये खाकी सेलोटेपने पॅक केलेल्या एकूण 189 पाकिटांमध्ये सुमारे 37 लाख 83 हजार 250 रुपये किमतीचा 378 किलो 325 ग्रॅम गांजा मिळून आला.
कारवाईत वाहनासह त्यात मिळून आलेला उग्र वासाचा गांजा असा एकूण 62 लाख 90 हजार 250 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला. या प्रकरणी कारचा वापरकर्ता व मालक यांनी संगमनत करून मादक पदार्थ अवैधरीत्या विक्रीच्या उद्देशाने बाळगून वाहतूक केली तसेच वाहन बेवारस स्थितीत सोडून पळून गेल्याने सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष पोलिस पथक हे कसोशीने आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे करीत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप व अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, विशेष पथकाचे निरीक्षक संजय गायकवाड, सहायक उपनिरीक्षक दीपक अहिरे, शांताराम नाठे, हवालदार सचिन धारणकर, चेतना संवत्सरकर, कॉन्स्टेबल विनोद टिळे, गिरीश बागूल, पोलिस नाईक जाधव यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा :
पंंतप्रधान दाैऱ्यासाठी जय्यत तयारी, केंद्रीय समिती आज नाशिकमध्ये दाखल होणार
Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरुवार, २८ डिसेंबर २०२३
जालना : मोटासायकल अपघातात सातोन्यातील तरुण ठार, तर दोन जखमी
Latest Marathi News निफाडकडून नाशिककडे जाणाऱ्या कारमध्ये 38 लाखांचा गांजा Brought to You By : Bharat Live News Media.
