पुणे : आव्वाज… पुरुषोत्तमचाच!

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : बॅकस्टेजची सुरू असलेली तयारी… कलाकारांना चिअरअप करण्यासाठी राज्यभरातून आलेले विद्यार्थी… सभागृहात दुमदुमलेला ‘आव्वाज कुणाचा…’चा जयघोष… संघातील युवा कलाकारांनी अभिनयातून जिंकलेली उपस्थितांची मने असे
जल्लोषपूर्ण वातावरण बुधवारी (दि. 27) पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत पाहायला मिळाले. महाअंतिम फेरीतील एकांकिका पाहण्यासाठी राज्यभरातील प्रेक्षकांनी उपस्थिती लावली आणि कलाकारांनीही एकांकिकांमध्ये अभिनयाची चमक दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. वेगळ्या धाटणीच्या विषयांनी, युवा कलाकारांच्या अभिनयाने अन् वेगळ्या मांडणीने दाद मिळवली.
‘महाराष्ट्रीय कलोपासक’ तर्फे आयोजित या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला बुधवारी उत्साहात सुरुवात झाली. पुण्यातील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या पिक्सल्स एकांकिकेने स्पर्धेची नांदी झाली. आपापल्या शहराची वैशिष्ट्यपूर्ण शैली आणि बाज घेऊन ‘पुरुषोत्तम’च्या मंचावर आलेल्या तरुणाईचा कलाविष्कार पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही गर्दी केली होती. पिक्सल्स एकांकिके सह सकाळच्या सत्रात देवगिरी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग, छत्रपती संभाजीनगर ‘खळगं खळगं’ एकांकिका, डॉ. विठ्ठलराव खोब्रागडे कला आणि वाणिज्य महाविद्यालय, नागपूर या संघाची ‘न्यायालयात जाणारा प्राणी’ आणि प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च संघाची ‘साकव’ ही एकांकिका सादर झाली.
तर सायंकाळच्या सत्रात मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, पुणे संघाची ‘फेलसेफ’, सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती संघाची ‘रात्र अंधार’, शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर संघाची ‘जंगल जंगल बटा चला है’, तर सर परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे संघाची ‘कृष्णपक्ष’ एकांकिका सादर झाली. देवगिरी महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी अंजली वाहुळ म्हणाल्या, दुष्काळावर आधारित एकांकिका आम्ही सादर केली.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या मंचावर आणि तेही पुण्यात सादरीकरण करून खूप आनंद झाला. तर ‘न्यायालयात जाणारा प्राणी’ एकांकिकेच्या दिग्दर्शिका निकिता ढाकुलकर म्हणाल्या, स्पर्धेत सादरीकरणाचा अनुभव खूप भन्नाट होता.
प्रत्येक कलाकाराने खूप मेहनतीने सादरीकरण केले. जाणकार प्रेक्षकांचीही दाद मिळाली.
हेही वाचा
तडका : राष्ट्रीय संकल्प दिन
अरे व्वा ! पुणेकर आता होताहेत आंतरराष्ट्रीय वाहनचालक
राम मंदिराच्या निर्मितीत अनेकांचे योगदान, एकट्या भाजपचे नाही : शरद पवार
Latest Marathi News पुणे : आव्वाज… पुरुषोत्तमचाच! Brought to You By : Bharat Live News Media.
