रासायनिक खतांच्या दरात तब्बल 40 टक्के वाढ

विवेक दाभोळे
सांगली : गेल्या चार वर्षांत खतांच्या किमतीत तब्बल 35 ते 40 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यात विविध कंपन्यांच्या खत दरात थोडा फरक असला, तरी पोत्यामागे सर्रास सव्वादोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी, शेतकर्यांचा उत्पादन खर्च भरमसाट वाढला आहे. ऐन हंगामात हा दरवाढीचा झटका शेतकर्यांना बसू लागला आहे.
सर्वसाधारणपणे खतांच्या दरात नोव्हेंबरमध्ये वाढ होते. याचीच पुनरावृत्ती झाली आहे. यावेळी प्रथमच विविध कंपन्यांनी खतांचे दर वाढविताना मनमानीपणाचा कळस केला आहे. मे 2021 मध्ये जाहीर झालेल्या दरवाढीनुसार महाधन, सरदार, आयपीएल या कंपन्यांची आघाडी राहिली होती. अर्थात, या वाढीत केंद्र सरकारने युरियाचा दर मात्र काही प्रमाणात आवाक्यात ठेवला आहे. मे 21 मध्ये युरियाचे पन्नास किलोचे पोते 266 रुपये होते. आता ते 278 रुपये झाले आहे.
सांगलीसह सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांत जवळपास साडेसात लाख हेक्टरच्या घरात उसाचे क्षेत्र आहे. जादा उत्पादन वाढीसाठी खतांचा वापर अपरिहार्य आहे. खतांच्या जोडीला संयुक्त खतेदेखील वापरण्याकडे शेतकर्यांचा कल वाढत आहे; मात्र आता संयुक्त तसेच मिश्रखतांच्या दरातदेखील वाढ झाली आहे.
साठा जुना; विक्री वाढीव दराने
अपवाद वगळता विक्रेत्यांकडील साठा हा जुन्या दराने खरेदी केलेला असतो; मात्र त्याची विक्री ही नवीन, वाढीव दराने करण्यात येत असते. यातून गावागावांतील कृषी सेवा केंद्रांचे मालक हे चांगलेच मालामाल होऊ लागले आहेत. आता तर रब्बी हंगामाची धांदल सुरू आहे. अनेक ठिकाणी ऊस तुटून गेल्यानंतर खोडव्यासाठी मशागती सुरू आहेत. शेतकरी आता मोठ्या प्रमाणात खतांची खरेदी करत आहे; मात्र त्याला महागड्या दरामुळे आर्थिक अडचण येत आहे.
Latest Marathi News रासायनिक खतांच्या दरात तब्बल 40 टक्के वाढ Brought to You By : Bharat Live News Media.
