गाय दूध अनुदान जाचक अटींच्या कचाट्यात!

आशिष ल. पाटील
गुडाळ : राज्य शासनाच्या दुग्धविकास खात्याने येत्या जानेवारी व फेब—ुवारी महिन्यात सहकारी संस्थांमार्फत संकलन होणार्या गाय दुधास प्रती लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र, या योजनेतील जाचक अटी शिथिल कराव्यात, अशी दूध उत्पादकांची मागणी आहे. अन्यथा या अटीमुळे गाय दुधाचे अनुदान अटींच्या खोड्यातच अडकणार आहे.
गाय दूध उत्पादकांना प्रती लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. या योजनेचा लाभ केवळ सहकारी दूध संस्थांना दूध पुरवठा करणार्या उत्पादकांना मिळणार आहे. तत्पूर्वी दूध संघांनी 3.2 फॅट आणि 8.3 एसएनएफ अशा प्रतिच्या दुधासाठी प्रती लिटर 29 रुपये दर देणे बंधनकारक केले आहे. संस्थांनी दूध बिले उत्पादकांच्या खात्यावर ऑनलाईन जमा करणे, उत्पादकाचे हे खाते आधार कार्ड आणि पशुधना आधार कार्डशी लिंक असणे आणि त्याची पडताळणी होणेही बंधनकारक राहणार आहे.
जिल्ह्यात गोकुळ आणि वारणा या दूध संघांकडे साडेसहा हजारच्या आसपास प्राथमिक दूध संस्था दूध पुरवठा करतात. त्यापैकी दहा टक्केच संस्था ऑनलाईन दूध बिले जमा करत आहेत. शासन अटीप्रमाणे उर्वरित संस्थांना ऑनलाईन बिले जमा करणे बंधनकारक राहणार आहे. शिवाय या संस्थांच्या लाखो उत्पादकांना बँकेत खाते असण्याबरोबरच त्यांच्या गायींची एन.डी.डी.बी.च्या इनाफ किंवा केंद्र सरकारच्या भारत पशुधन अॅपवर नोंदणी आणि पडताळणी असणे बंधनकारक राहणार आहे. यापैकी दोन अटी शिथिल कराव्यात, अशी उत्पादकांची मागणी आहे.
हे अनुदान संघाच्या किंवा संस्थांच्या खात्यावर जमा करावे आणि संस्थांनी दूध बिलातून ते उत्पादकांना अदा करावे, हे सयुक्तिक राहणार आहे. गोकुळ आणि वारणा संघांकडून 8 लाखांच्या आसपास लिटर गाय दूध संकलित केले जाते. अटीतील निर्धारित 29 रुपये दराऐवजी 30 रुपयेपेक्षा जास्त दर या दोन्ही संघांकडून गाय दूध उत्पादकांना दिला जातो. त्यामुळे शासनाच्या अनुदानाची प्रती लिटर पाच रुपयेप्रमाणे दरमहा 12 कोटी रुपये रक्कम दूध उत्पादकांना जादा स्वरूपात मिळणार आहे.
Latest Marathi News गाय दूध अनुदान जाचक अटींच्या कचाट्यात! Brought to You By : Bharat Live News Media.
