
छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन शिष्यवृत्ती परीक्षेत रविवारी (दि. २४) मोठा गोंधळ झाला होता. संशोधक विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात आधीच फोडलेल्या लिफाफ्यातील प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. तसेच जो पेपर दिला गेला तोही २०१९ सालचा सेट परीक्षेचा होता असा आरोप करीत विद्यार्थ्यांनी ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत अखेर ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच आता ही परिक्षा १० जानेवारी रोजी पुन्हा एकदा घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Research Fellowship Exam)
पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) यांच्यातर्फे संशोधन शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी रविवारी राज्यात संयुक्त पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत राज्यातील पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि नागपूर या चार शहरात ही परीक्षा घेण्यात आली. परंतु छत्रपती संभाजीनगरातील देवगिरी महाविद्यालयाच्या केंद्रांवर विद्यार्थ्यांना आधीच फोडलेल्या बंद लिफाफ्यातील प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यावर जोरदार आक्षेप घेत परीक्षा कक्षाबाहेर आंदोलन सुरू केले होते. अखेर प्रशासनाच्या विनंतीवरुन विद्यार्थी पुन्हा परीक्षा कक्षात जाऊन बसले. परीक्षेत जो पेपर दिला गेला तो २०१९ साली झालेल्या सेट परीक्षा असल्याचे नंतर अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा रद्द करुन पुन्हा घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ही परीक्षा रद्द केली असून ती १० जानेवारी रोजी नव्याने घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा
Latest Marathi News पेपरफुटी प्रकरणानंतर पीएचडी फेलोशीप परीक्षा रद्द; ‘या’ तारखेला होणार पुन्हा परीक्षा Brought to You By : Bharat Live News Media.
