पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात हंडा मोर्चा

पाथर्डी तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा : पिण्यासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी निवडुंगे येथील महिलांनी पाथर्डी पंचायत समितीच्या कार्यालयात हंडा मोर्चा काढला. गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या मांडत महिलांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाचा निषेध केला. पाणी आमच्या हक्काचं, मिळायलाच पाहिजे. पाणी न देणार्या अधिकार्यांचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणा देत महिला व कार्यकर्त्यांनी कार्यालय दणाणून सोडले. आसाराम ससे, सरपंच वैभव देशमुख, अमोल मरकड, सोमनाथ शिरसाठ, माणिक सावंत, सीताराम बोरूडे, देवा पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
सुशिला चन्ने, रंजना क्षीरसागर, चंद्रकला बादल, नगिनी शेख, विजया राउत, उषा शिंदे, यास्मिन पठाण, कोमल मरकड, वैशाली कोकणे, बेबी कोकणे, हौसाबाई काळे, शांताबाई आगळे, प्रयागा चिकणे, चंद्रकला मरकड आदी महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
गेल्या अनेक दिवसांपासून निवडुंगे गावाला पिण्याचे पाणी मिळत नाही. याबद्दल वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही अधिकारी गाांभीर्याने घेत नाहीत. हक्काच्या पाण्यासाठी आम्हाला वेळोवेळी आंदोलन करण्याची वेळ येत आहे. पाण्याशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यात नादुरूस्त किंवा छोटे-मोठे प्रश्न पाण्यासंदर्भात उद्भवले, तर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ग्रामस्थ, महिला संतप्त झाल्या होत्या.
अधिकार्यांनी आमच्या पाण्याच्या प्रश्नासाठी डोळेझाक करू नये. अन्यथा आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा महिलांनी यावेळी दिला. गावातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक ती दुरूस्ती करून नियमित पाणीपुरवठा केला जाईल, असे लेखी आश्वासन ग्रामीण पुरवठा उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पाण्याशिवाय संसार कसा करायचा?
पाणी नाही तर आम्ही संसार कसा करायचा, शेतीतील कामे कशी करायची, पाणी भरायचे की शेतीमधील कामे करायची, असा संतप्त सवाल करीत महिलांनी हंडे वाजवून गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा निषेध व्यक्त केला.
हेही वाचा
Nagar: पोलिस मित्रांची वारी..ठाण्याच्या दारी!
बारामतीतील दहा शेतकर्यांना वन विभागाकडून भरपाई
Pune News : लाल कांद्यांची उपबाजारात मोठी आवक; मात्र दर घसरलेलेच
Latest Marathi News पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात हंडा मोर्चा Brought to You By : Bharat Live News Media.
