नांदे-महाळुंगे रस्त्याचे काम 10 दिवसांत चालू करणार; अधिकार्यांची माहिती

नांदे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरालगत असूनही रखडलेला नांदे-महाळुंगे रस्त्यासाठी लवकरच पावले उचलली जाणार आहेत. गुरुवारी (दि. 21) संतप्त नांदे ग्रामस्थांनी या रस्त्याच्या बिकट अवस्थेला कंटाळून रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर लागलीच आमदार संग्राम थोपटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथे बैठक घेत यातून तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यातूनच येत्या 10 दिवसांत काम सुरू होणार असल्याचे आश्वासन संबंधित अधिकार्यांनी दिले.
या बैठकीस आमदार संग्राम थोपटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, मुळशीचे अधिकारी मधुकर भिंगारदिवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर, माजी सरपंच प्रशांत रानवडे, अविनाश करंजावणे, सचिन करंजावणे आदी उपस्थित होते. मुळशी तालुक्याला अतिशय उपयुक्त ठरू शकणारा नांदे- महाळुंगे रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून बिकट अवस्थेत आहे. येथे निधी मंजूर होऊन पण रस्ता होत नव्हता. ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता करण्यास असमर्थ ठरत होते.
तांत्रिक अडचणी व रस्ता करताना होणारी अडवणूक त्यास कारणीभूत ठरत होती; मात्र त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे समस्त नांदे ग्रामस्थ यांच्यावतीने पुढाकार घेत माजी सरपंच प्रशांत रानवडे यांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यास मुळशीतील सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता. त्याची दखल घेत तत्काळ आमदार संग्राम थोपटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामस्थ यांची बैठक घेतली. त्यात येत्या 10 दिवसांत रस्त्याचे काम सुरू होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सध्या तरी नांदे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
रस्ता अडवणूक करणार्यांवर गुन्हे दाखल करा
या रस्त्याच्या कामात कोणी अडवणूक करत असेल किंवा करेल तर त्यांच्यावर लागलीच गुन्हा दाखल करावा, असे आदेश आमदार संग्राम थोपटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. त्यामुळे रस्त्याच्या कामात अडवणूक करणाऱ्यांना आता कारवाईला सामोरे जावे लागेल.
हेही वाचा
मुठा घाट अपघातप्रकरणी कारवाई करा; तरुणांचे पौड पोलिसांना निवेदन
कॅन्सरपेक्षाही भीती ठरली जीवघेणी; बापानेच घोटला मुलाचा गळा
जल, जंगल, जमिनीची पुरेवाट: जांभूळवाडी तलाव जलपर्णीने व्यापला
Latest Marathi News नांदे-महाळुंगे रस्त्याचे काम 10 दिवसांत चालू करणार; अधिकार्यांची माहिती Brought to You By : Bharat Live News Media.
