जल, जंगल, जमिनीची पुरेवाट: जांभूळवाडी तलाव जलपर्णीने व्यापला
कात्रज : Bharat Live News Media वृत्तसेवा: नव्याने समाविष्ट झालेल्या आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी तलावात मिसळणार्या मैलायुक्त पाण्यामुळे जलप्रदूषण होऊन जलपर्णीने वेढला गेला आहे. त्यामुळे हा तलाव आहे की क्रिकेटचे मैदान, असा प्रश्न पडत आहे. दुर्गंधीने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दक्षिण पुण्यातील आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक परिसरातील मुख्य जलस्त्रोत म्हणून ओळख असलेला जांभूळवाडी तलाव प्रदूषण, जलपर्णी व अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे.
जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षामुळे समस्या अधिकच बिकट बनत चालली आहे. तलावातील जलस्त्रोत दूषित होत आहेत. पालिका प्रशासनाकडून जलपर्णी हटवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू केले आहे. मात्र जलपर्णीचा विस्तार आणि मर्यादित यंत्रणेमुळे समस्या सुटण्याबाबत शंका आहे. जलपर्णी वाढण्याचे मुख्य कारण परिसरातील रहिवासी सोसायट्यातुन तलावात मिळसणारे मैलायुक्त पाणी आहे. लाखो मासे मृत्यू पावण्याची घटना घडल्यानंतर ड्रेनेज लाईनचे काम सुरू करण्यात येईल.
नागरिकांची निराशा
निसर्गरम्य तलाव परिसरात घर असावे, या विचारातून कर्ज काढून लाखोंचे फ्लॅट घेतलेल्या नागरिकांची घोर निराशा झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या संयमाचा अधिक अंत न पाहता तलाव प्रदूषणमुक्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तलावातील जलपर्णी व प्रदूषणाने नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. गेली सहा वर्षे जलसंपदा विभागाकडून पालिकेकडे हस्तांतरणासाठी पाठपुरावा केला. ड्रेनेज जोडणी कामे, जलपर्णी काढण्यासाठी यंत्रणा वाढवावी.
– युवराज बेलदरे, माजी नगरसेवक
सिंहगड किल्ल्यावर समाजकंटकांकडून वणवा
पावसाळा संपल्यानंतर सिंहगड किल्ल्याच्या जंगलाला यंदाच्या हंगामात प्रथमच भीषण वणवा लागण्याचा प्रकार घडला. वणवा लावून समाजकंटक पसार झाले. वनविभागाच्या प्रसंगावधानतेने घनदाट जंगलातील वणवा सायंकाळी उशिरा दीड तासात नियंत्रणात आणला गेल्याने वनसंपदेची मोठी हानी टळली. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सिंहगड किल्ल्यावर मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करत आहेत. दुसरीकडे गडाच्या जंगलाला अज्ञात समाजकंटक वणवा लावत आहेत. त्यामुळे वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे. गडाच्या घाटरस्त्यावरील मोरदरी खिंडीतील जंगलात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक वणवा लागला.
त्या वेळी गडावरून खाली येत असलेले वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वाईकर, संदीप कोळी यांनी घेरा सिंहगड वन संरक्षण समितीचे अध्यक्ष पांडुरंग सुपेकर व सुरक्षा रक्षकांसह मोरदरीच्या खिंडीत धाव घेतली. मोरदरी खिंडीतील घनदाट जंगलात वणवा पसरू लागला. जोरदार वारे वाहू लागल्याने वणव्याचा मोठा भडका उडाला. त्या वेळी अंधारही पडू लागल्याने वणवा आटोक्यात आणताना अडथळे निर्माण झाले. वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील, संदीप कोळी, पांडुरंग सुपेकर, व सुरक्षारक्षकांनी झाडाझुडपांच्या फांद्या, डहाळ्यांनी वणवा आटोक्यात आणण्यासाठी अक्षरश: झुंज दिली. दीड तासानंतर वणवा आटोक्यात आला. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
वणवे रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेऊनही दरवर्षी जानेवारी फेब—ुवारीत भीषण वणवे लागतात. यंदा डिसेंबरमध्येच वणवा लागला. वणवे लावणारे समाजकंटक सापडत नाहीत. त्यामुळे जंगलात महत्त्वाच्या ठिकाणी वेब कॅमेरे बसविण्यात यावेत.
– पांडुरंग सुपेकर, अध्यक्ष, घेरा सिंहगड वन संरक्षण समिती
हेही वाचा
अजित दादांच्या आव्हानाचे माझ्यावर दडपण नाही : खा. अमोल कोल्हे
Rahul Meets Wrestlers : राहुल गांधी थेट कुस्तीच्या आखाड्यात; पैलवानांकडून शिकले डावपेच
क्षेत्र नारायणपूर येथील दत्तजयंती सोहळ्याची सांगता
Latest Marathi News जल, जंगल, जमिनीची पुरेवाट: जांभूळवाडी तलाव जलपर्णीने व्यापला Brought to You By : Bharat Live News Media.