पाणीपट्टी न भरल्यास पुरवठा बंद; महापालिकेचा कारवाईचा इशारा
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात महापालिकेची पाणीपट्टी थकीत आहे. शासकीय संस्थांकडे असलेल्या पाणीपट्टीची थकबाकी 150 कोटींच्या घरात असल्याने ती वसूल करण्यासाठी संबंधित संस्थांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. जे थकबाकी भरणार नाहीत, त्यांचा पाणीपुरवठा बंद केला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
शहरात केंद्र व राज्य शासनाची अनेक कार्यालये आहेत. या सर्वांना महापालिकेकडून पाणीपुरवठा करते. कॅन्टोन्मेंट बोर्ड, संरक्षण खात्याची विविध कार्यालये, रेल्वे, पोस्ट, आकाशवाणी, बीएसएनएल या केंद्र सरकारच्या आस्थापनासह राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम, पोलिस, महावितरण आदी आस्थापनांकडे महापालिकेची 150 कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतात. परंतु, या संस्थांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यातच आता गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कमी प्रमाणात पाणीपट्टी जमा झाली आहे. त्यामुळे थकबाकीदार संस्थांना नोटीस पाठविण्यात येणार आहेत. 31 जानेवारीपर्यंत ही थकबाकी भरावी; अन्यथा संबंधितांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
कॅन्टोन्मेंटकडे 40 कोटी थकीत
शासकीय संस्थांकडील थकबाकीविरोधात महापालिकेने मागील वर्षीदेखील विशेष मोहीम राबविली होती. एकट्या पुणे कॅन्टोन्मेंटकडे 40 कोटी रुपयांची थकबाकी आहे. मागील वर्षी कॅन्टोन्मेंटचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्या दिवशी कॅन्टोन्मेंटने तातडीने दोन कोटी रुपयांची थकबाकी भरली. परंतु, यानंतर पुन्हा थकबाकी भरण्याकडे डोळेझाक करण्यात येत आहे. अशीच परिस्थिती अन्य संस्थांबाबत असल्याने मोहीम कडक करण्यात येणार आहे.
फुरसुंगीचा पाणीपुरवठा 31 जानेवारीपर्यंत सुरू होणार
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून देवाची उरुळी, फुरसुंगी आणि मंतरवाडीला पाणीपुरवठा योजना आखली आहे. यासाठी महापालिकेनेही निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेतील पाइपलाइन, साठवण टाकी आणि जलकेंद्राचे काम झाले असले तरी रेल्वेलाइन ओलांडून टाकाव्या लागणार्या मुख्य वाहिनीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तसेच, फुरसुंगी परिसरासाठी लष्कर जलकेंद्रातून पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. पुढील महिनाभरात जलकेंद्रावर पंप बसविल्यानंतर देवाची उरुळी, फुरसुंगी व मंतरवाडीला पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा सुरू होईल.
हेही वाचा
क्षेत्र नारायणपूर येथील दत्तजयंती सोहळ्याची सांगता
‘पिक्सल्स’ने सुरू होणार पुरुषोत्तमची महाअंतिम फेरी
मागोवा 2023 : सर्वांत कमी पाऊस, थंडी अन् विक्रमी प्रदूषण
Latest Marathi News पाणीपट्टी न भरल्यास पुरवठा बंद; महापालिकेचा कारवाईचा इशारा Brought to You By : Bharat Live News Media.